टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कल्याण : कल्याण डोबिंवली मनपाच्या कोवीड उपचारासाठी १ एप्रिलपासून सुरु केलेले भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा कोविड उपचार केंद्रातून कोरोना रुग्णांना उपचार विविध सेवा सुविधा पुरविण्याऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, हाऊसकिपिंग कर्मचारी व भटारखान्यात काम करणाऱ्या या सर्व कोरोना योद्ध्यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. मनपाच्या कोविड सेंटरमधून आतापर्यंत सुमारे १३ हजार कोरोना रुग्णांनी आणि कोरोना संशयितांनी उपचार घेत कोरोनावर मात केली असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांना हे कोविड सेंटर आधार ठरले आहे.                         

भिवंडी बायपासजवळ असलेल्या टाटा आमंत्रामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोरोना संशयित रूग्णांसाठी सुसज्ज अशा २ बी इमारतीमध्ये २४५ रुममध्ये तब्बल ४९० बेड्स तसेच २ ए इमारतीमध्ये १०८ रुम्समध्ये २१६ बेड तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी १७ फ्लोरमध्ये ८६२ रूम्स १,७२४ बेडची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये आवश्यकता भासल्यास आँक्सिजन सुविधा देखील उपलब्ध असून एकाचवेळेस कोवीड, कोवीड संशयित अशा सुमारे २४३० रुग्णांसाठी उपचाराची यंत्रणा सक्षमपणे रूग्णांवर उपचार करीत आहे. 

या रुग्णांना कोरोना मुक्त करण्याचे काम अहोरात्र सुरू असुन संशयित कोरोना रूग्णांसाठी ग्रीन झोन तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी रेड झोन तयार करीत इगतवारीनुसार रूग्णांना दाखल करीत, उपचार करून डिस्चार्ज  होईपर्यत यंत्रणा देखरेख करीत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी १२ डॉक्टरांच्या पथकासह १९ नर्स, २१वार्ड बॉय, तसेच खाजगी कंत्राटदाराचे १६० हाऊसकीपिंग कर्मचारी, खाजगी कंत्राटदाराचे भटारखान्याचे ३० कर्मचारी सकाळ व रात्र पाळीत काम करीत रूग्णसेवा करीत रूग्णावर उपचार करतात. १ डॉक्टर ४ फ्लोरमधील रूग्णांची देखरेख करतात. 

येथील रुग्णांना गोळ्या औषधांसह बेडशीट, कोलगेट, साबण, खोबरेल तेल आदी जीवनावश्यक कीट दिले जाते. रूग्णांना मोफत बिसलेरी वॉटर सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, रात्री जेवणाची मोफत सुविधा आहेत. येथील स्वच्छता, जेवण नाश्ता बनिविणे यामध्ये सेवा देणाऱ्या या कर्मचारी, डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय  यांचा सत्कार स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आला. या निमित्ताने प्रत्येक प्रवेशद्वारावर फुग्यांची आकर्षक कमानी  हाऊस किपिंगचे श्रीकांत यांनी करून लुक बदलला होता. 

रॉबिनहुड एनजीओमार्फत कोवीड योध्द्यांचा सत्कार करीत कामाचे गुण गौरव सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळीत  कोवीड योद्धांचे मनोबल वाढविले. यामध्ये डॉक्टर सायली पाटील, शीतल पाटील,  अमोल कांबळे, ज्योती सूर्यवंशी, प्रिती भालकर, प्रशांत तिबेरवाल, प्रियंका राठोड तसेच काही महिन्यापूर्वी इंटर्नशिप पूर्ण करून थेट कोरोना सेंटरमध्ये रूग्णसेवा देणारे डॉक्टर नसारा शेख,  बुशारा, अब्राहर अन्सारी, हुद्दा अन्सारी, चावरा शेख यांच्यासह नर्स इन्चार्ज संगिता पोटे, वॉर्ड बॉय इन्चार्ज राजु कदम, चव्हाण यांच्यासह सर्वच कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनपा सचिव संजय जाधव, मुख्य डॉक्टर दिपाली मोरे, व्यवस्थापक कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, उप अभियंता प्रमोद मोरे, उद्यान विभागाचे अनिल तामोरे यांच्या उपस्थितीत कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. मनपा सचिव यांनी याप्रसंगी कोरोना योद्ध्यांच्या कामाचे कौतुक करीत कोरोना संकटातून आपण धडा शिकलो आहे की,  हॉस्पिटल सुविधा अत्यंत महत्वपूर्ण असुन जास्तीत जास्त हॉस्पिटल उपलब्ध करून आरोग्य सुविधांवर भर दिला पाहिजे असे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले.