भिवंडीत गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज 

भिवंडी : कोरोना संक्रमण पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले असून ते लक्षात घेता भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विसर्जन प्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एक अॅप बनविले असून त्या माध्यमातून नागरीकांनी आपली नोंदणी करावयाची असून त्यामध्ये नोंदणी प्रसंगी मिळालेल्या वेळेतच विसर्जन करणे गरजेचे आहे . महानगरपालिका उपायुक्त नूतन खाडे, कार्यकारी अभियंता एल पी गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गावित, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी वऱ्हाळ देवी तलाव विसर्जन घाटास भेट देऊन विसर्जन परिस्थितीचा आढावा घेतला.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात वऱ्हाळ तलाव ,पोगाव ,भादवड , नारपोली ,ताडाळी ,कामवारी नदी या सात ठिकाणी नऊ विसर्जन घाट असून तेथे महानगरपालिका,पोलीस यांचे पथक तैनात राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एल पी गायकवाड यांनी दिली आहे . मागील वर्षी दीड दिवसाचे ३९३०,पाच दिवसांचे ४४४४ घरगुती तर १०७ सार्वजनिक व दहा दिवसांचे २५७७ घरगुती तर ४६१ सार्वजनिक गणेश मूर्तींसह २५० गौरी अशा एकूण १०९५० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. त्या तुलनेत यंदा कमी गणेशमूर्ती स्थापना होणार असल्या तरी महानगरपालिका प्रशासन या गणेशोत्सव काळात उपाययोजना करण्यासाठी सज्ज असल्याचा निर्वाळा कार्यकारी अभियंता एल पी गायकवाड यांनी दिला या कालावधीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले.