महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नगरसेविकेचा जनआंदोलनाचा इशारा

कल्याण :  टिटवाळा परिसरात वारंवार विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहक  हैराण झाले आहेत. या समस्येवर अनेक वेळा मोर्चे, उपोषण, आंदोलने करूनदेखील महावितरणाचा सावळा गोंधळ अद्यापही सुधारलेला नाही. कालदेखील दोन दिवस संपूर्ण वेळ येथील नागरिकांना अंधारात काढावे लागले. याबाबत नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी संबंधित विभागाला निवेदन देत सर्व समस्यांचे निवारण करावे अन्यथा  हे सर्व असेच सुरू राहिल्यास महावितरण विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुरू करू असा इशारा दिला आहे. 

वीज वितरण कंपनीकडून नवीन ब्रेकर मंगळवारी गोवेली उपकेंद्र येथे आणण्यात आले आहेत. ते बसविण्याचे काम प्रगती पथावर सुरू असल्याचे तसेच मंगळवारी रात्री झालेल्या तांत्रिक बिघडकारिता बुधवारी वितरणकडून काही वेळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. उपकेंद्रातील सर्व ब्रेकर्स बसल्यानंतर वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत होईल. असे मांडा टिटवाळा महावितरण सहाय्यक अभियंता निलेश महाजन यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र पावसाळया व्यतिरिक्तही अनेकदा विजेचा लंपडाव हा या परिसरात नियमितपणे चालू असल्याचे येथील स्थानिक नागरिक ॲड. जितेंद्र जोशी यांनी सांगितले आहे. टिटवाळा येथील महावितरणाकडून वारंवार होणारा खंडित होणारा वीजपुरवठा आणि चुकीची घेतली जाणारी रीडिंग त्यामुळे अवाजावी येणारी बिले , तक्रारींचे योग्य पद्धतीने न होणारे निवारण यांसारख्या महावितरणाच्या गलथान आणि भोंगळ कारभाराला कंटाळून ॲड. जोशी यांनी महावितरणाला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. 

लॉकडाउनमुळे सर्वजण घरात असतांना मोठया प्रमाणात कामगारवर्ग वर्क फ्रॉम होम म्हणून काम करत आहे. तर, आता शाळांनीही ऑनलाईन क्लासेस घेण्यास सुरुवात केली आहे. असे असताना मांडा-टिटवाळा क्षेत्रात गेली कित्येक दिवस दररोज दिवसातून अनेक वेळा लाईट जाण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे वयोवृद्धांसहित सर्व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेच्या या खेळखंडोबामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची विजेची उपकरणे खराब होत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल करत नगरसेविका भोईर यांनी महावितरणाचे सबंधित अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. संततधार कोसळत असणाऱ्या पावसामुळे  गोवेली येथील विद्युत उपकेंद्रातील ब्रेकर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील  ६८ गावांत विद्युत पुरवठा सतत खंडीत होत आहे. यामुळे येथील हजारो वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरण कार्यालय व ऑनलाईन तक्रार दाखल करूनदेखील परिस्थिती जैसे थे असे नागरिकांचे मत झाले आहे. प्रत्यक्षात या शहराचा विकास झपाट्याने होत असताना महावितरण पुरवत असलेली सेवा ही ग्रामीण भागापेक्षा बिकट आहे. अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो की, पावसाळ्यात विजेसंदर्भात समस्या निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण उन्हाळ्यात मेन्टेनन्सच्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात जो एक दिवस शटडाऊन घेतला जात होता. त्याचा उपयोग काय? आताच लॉकडाऊनमध्ये नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट असताना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना दिवसातून अनेकवेळा लाईट जात असल्याने मांडा-टिटवाळावासीयांची सहनशक्ती संपत चालली असल्याचे  नगरसेविका भोईर यांनी आपल्या निवेदनातून म्हटले आहे.  याबाबत गोविंद बोडके सह व्यवस्थापकीय संचालक कोकण तसेच अग्रवाल मुख्य अभियंता महावितरण कल्याण आणि शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांना निवेदन दिले असून हे सर्व असेच सुरू राहिल्यास महावितरण विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुरू करू असा इशाराही दिला आहे.