म्हसळ्यामध्ये कोविड सेंटरचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

म्हसळा :  देशात आणि पर्यायाने राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असून रायगड जिल्ह्यातील कोरोना पूर्णपणे नष्ट व्हावा आणि त्याला आळा घालण्यासाठी पालक मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे अनेक उपाय करीत आहेत. म्हसळ्यासारख्या ग्रामीण आणि डोंगराळ भागातील सर्वसामान्य बाधित रुग्णांना कोरोनाचा उपचार न परवडणारा असल्याने म्हसळ्यामध्येच बाधितांवर उपचार व्हावा आणि रुग्ण लवकरात लवकर पूर्णपणे बरा व्हावा या दृष्टीने म्हसळा येथील अल-हमद हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन आम.अनिकेत तटकरे यांच्या काल करण्यात आले.

नियोजनबद्ध व युद्धपातळीवर कोरोनावर मात करण्यासाठी आजारी नागरिकांनी घरी बसून न राहता स्वतःची व कुटुंबातील आजारी व्यक्तीची सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले. तसेच याकडे शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनीही अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा जयश्री कापरे,उपनगराध्यक्ष सुहेब हालडे,संजय कर्णिक,नाजिम हसवारे,डॉ.मुकादम,नगरसेवक करण गायकवाड,नसिम खान,सलिम वस्ता, माजी नगरसेवक दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.