महाड बिल्डिंग दुर्घटनेसंदर्भात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महाड: काल संध्याकाळी महाड शहरातील काजळपुरा भागात तारीक गार्डन नावाची बिल्डिंग कोसळली. ही बिल्डिंग कोसळण्यामागे कमकुवत बांधकाम हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची गंभीर दखल घेत सर्व संबंधितां विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
या आदेशानुसार, महाड नगरपालिकेचे नगर अभियंता सुहास कांबळे यांनी बिल्डर फारुख काझी (रा. तळोजा, पनवेल) आर्किटेकट गौरव शहा (नवी मुंबई) आरसीसी सल्लागार बाहुबली धामणे (नवी मुंबई ) महाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तत्कालीन कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक शशिकांत दिघे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.  शहर पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध भादंवि. कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३०४अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत), ३३७ (जीवितास धोका निर्माण करणे), ३३८ (हलगर्जीपणामुळे दुसऱ्याचा जीवितास किंवा वैयक्तिक हानिस कारणीभूत ठरणे )आणि ३४ ( संगनमत) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद हे करणार आहेत.