महाडमध्ये साधेपणाने साजरा झाला दहिहंडी उत्सव

महाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करित उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज महाड शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

आ.भरतशेठ गोगावले मित्र मंडळाच्यावतीने आज दहिहंडी उत्सव परंपरेचा मान राखत साधेपणाने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजुशेठ पावले , तालुका संघटक सुभाष मोरे ,उपाध्यक्ष स्वप्नील  आर्ते , अमित शेट्टी , मंडळाचे सहसचिव अमित कदम,प्रभू लॉजचे मालक चंदू खर्डेकर तसेच मंदार माने ,राजू जाधव व शुभम पवार इत्यादी उपस्थित होते.

सरेकर आळी मित्र मंडळ, नूतन मित्रमंडळ आणि शिवाजीचौक मित्र मंडळाने दहीहंडी न बांधता केवळ पूजन करून हा उत्सव साजरा केला. दरवर्षी महाड शहरात या उत्सवाच्या दिवशी महाड बाजारपेठेचा परिसर गोविंदा पथके आणि गोविंदा पथकांच्या थरांचा थरार पाहणाऱ्या नागरिकांनी फुलून गेलेला असतो. खालूबाजाचा नाद संपूर्ण शहरभर घुमत असतो. यावर्षी मात्र बाजारपेठेत कमालीची शांतता पाहावयास मिळत होती.

हंडी फोडायला मिळत नसल्याने बाल गोपाळ हिरमुसले होते. त्यांच्या आनंदावर विरजण नको म्हणून शिवसेनेचे नगरसेवक दीपक सावंत यांनी लहान मुलांसाठी छोटी दहीहंडी बांधून त्यांना आनंद लुटण्याची संधी दिली. महाड प्रेस असोसिएशनने कोरोना विरोधातील लढाईत सॅनिटायझरचे महत्व मोलाचे असल्याचा संदेश दिला. दहीहंडी भोवती सॅनिटायझरच्या बाटल्या बांधून ही दहीहंडी प्रेस असोसिएशनच्या मोजक्या सदस्यांनी हातामध्ये धरून फोडली.