दहिहंडीसाठीच्या मडक्यांची विक्रीच होत नसल्याने विक्रेते चिंतेत

मुरूड जंजिरा : गोकुळाष्टमीचा सण दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय काही ग्रामस्थ व शहरी भागांनी घेतल्याने मडकी विकणाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गोकुळाष्टमीचा दिवस उजाडला तरी दहीहंडीसाठी मडकी घ्यायला मुरूड  बाजारपेठेत ग्राहकच नसल्याने या विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे. मुरूडमधील कुंभारवाड्यात दरवर्षी दहीहंडीसाठी मडकी बनवली जातात. आज त्यांच्याकडे शेकडो मडकी तयार आहेत. पण कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाला बंदी असल्याने उत्सवकर्त्यांनी मडकी घेण्याकडे पाठ फिरवल्याने मडकी विक्रेत्यांना हजारो रूपयांचे  नुकसान सोसावे लागणार  आहे.

मडकी विक्रेत्या रीना राजपुरकर म्हणाल्या की, आज गोकुळाष्टमीचा दिवस असूनसुध्दा सकाळपासून ग्राहक नाही. मात्र दुपारच्या दरम्यान एक- दोन मडकी विकली गेली तर माझे सहकारी म्हसळकर यांच्याकडे तर एकही मडके विकले गेले नाही. या व्यवसायात मेहनत जास्त आणि कमाई कमी असते.एक मडके बनविण्यासाठी साधारण  २०रूपये खर्च होतो. मडकी तयार झाल्यावर आम्ही ही मडकी बाजारात आणुन २५ रूपयाला विकतो. मात्र ग्राहक नसल्याने यंदाचा सीझन गेल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.  राज्य सरकाराने आमच्या समाजाकडे लक्ष देऊन भरपाई पॅकेज द्यावे ,अशी मागणी मुरूड कुंभारवाड्यातील  रिना राजपुरकर यांनी केली आहे.