राज्यसेवेच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जवळच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  राज्य सेवेची पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षार्थीना परीक्षेसाठी  त्यांच्या जवळचे जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा  एमपीएससीने  दिली आहे. यासाठी काल एमपीएससीकडून  परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार केवळ पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकीच पुणे महसुली विभागाच्या बाहेरील जिल्हा/शहरामधील कायमस्वरूपी पत्ता नमूद असलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या म्हणजेच मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती केंद्र निवडण्याची यामध्ये मुभा देण्यात आली आहे.  मात्र इतर विभागाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा मिळावी याबाबत मागणीचा जोर  काही विद्यार्थ्यांनी धरल्याने  आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री, एमपीएससी अध्यक्ष यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांनी आधी निवडलेली परीक्षा केंद्र बदलून देऊन त्यांच्या स्वतः च्या जिल्ह्यात त्यांना सोयीचे होईल असे जिल्हा केंद्र द्यावीत अशी मागणी केली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य पूर्व परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी पुणे शहरात येतात. आणि परीक्षेसाठीही पुणे केंद्राची निवड  करतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे पुण्यात अभ्यासासाठी आलेले  अनेक विद्यार्थी पुणे शहर/जिल्हा सोडून मूळ गावी परतले. परंतु अनेकांनी परीक्षेसाठी पुणे केंद्रांची निवड केल्याने  त्यांना केंद्र बदलण्याची मूभा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत एमपीएससीने १४ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून ही मूभा देण्यात येत असल्याच सांगितले. 

या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, पुणे सोडून इतर जिल्ह्यत वास्तव्यस असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र बदलून हवे असल्यास जवळच्या महसूल विभाग मुख्यालय असलेल्या जिल्ह्यात परीक्षा देण्यास यावे लागणार आहे.यामुळे  विद्यार्थ्यांना पुणे सोडून औरंगाबाद, नाशिक, मुंबई, अमरावती, नागपूर हे केंद्र निवडण्याची मूभा मिळाली आहे. मात्र यावर काही विद्यार्थ्यांनी  यावर आक्षेप घेतला आहे.  या आक्षेपानुसार आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सोयीस्कर असा जिल्हा केंद्र म्हणून निवडता यावा असे केंद्र परिक्षेसाठी देण्याची मुभा करावी अशी मागणी  केली आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रवास करण्यासवर विद्यार्थ्यांना मर्यादा असताना तसेच अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे जिल्हाबाहेर प्रवासाला निर्बंध असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार आपपल्या किंवा सोयीच्या जिह्यात परीक्षा देण्यात आदेश द्यावेत, अशी मागणी कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने केली आहे.