कल्याणमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्यांना वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी

कल्याण : कल्याण शहरामध्ये कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणेशोत्सवा दरम्यान गणेश घाटावर गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या कोळी बांधवांना वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण शहरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती हे कल्याण कोळीवाडा येथील कोळी बांधव खूप वर्षांपासून विसर्जन करण्याचे काम दुर्गाडी गणेश घाटावर विनामूल्य करीत आहेत. यावर्षी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्या कोळी बांधवांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी विसर्जनाच्या आधी त्यांची कोरोना तपासणी महानगरपालिकेच्या खर्चातून करण्यात यावी. तसेच त्यांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर आदी प्रकारची वैद्यकीय सुविधासुद्धा महानगरपालिकेच्या खर्चाने देण्यात याव्या. जेणेकरून गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी येणारे भाविक आणि कोळी बांधव या दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहील आणि कल्याण शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढणार नसल्याचे मत कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.