भिवंडी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी

भिवंडी:  शहरातील दाटीवाटीच्या नागरी वस्तीत झपाट्याने फोफावणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात वाढला असल्याने आतापर्यंत २९७१ रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले असून त्यापैकी ९४ जणांचा मृत्यु झाला तरी सुध्दा भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.  सावद येथे उभारण्यात येणाऱ्या ९०० बेड क्षमतेच्या जिल्हा कोरोना हेल्थ सेंटर आणि कोव्हिड केअर सेंटरचे काम अजूनही अपूर्ण असून तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना चाचणीची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता असताना व तसे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर ही ती होत नसल्यासे दिसून येत आहे. शिवसेना तालुका ग्रामीण वतीने शिवसेना तालुका सचिव जय भगत,दिपक पाटील,उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील,भिवंडी जि.प.गट.सचिव संदीप पाटील,शाखा प्रमुख.अनंता भामरे, गोरख थळे,काल्हेर ग्रामपंचायत माजी सरपंच मंगेश माळी, शिवस्पर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखरमामा फरमन यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंघे यांची भेट घेऊन तालुक्यातील आरोग्य सुविधा सुधारण्याबाबतचे निवेदन देऊन त्यांना साकडे घातले आहे . 

भिवंडी ग्रामीण तालुक्यातील जनतेसाठी कोणतीही उपाययोजना नसणे, कोरोना चाचणी मोफत होत नाही.ॲन्टीजेन टेस्ट सेन्टर,व स्वाॅब मशीन शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी आवश्यक जागा सुविधा आम्ही उपलब्ध करून देण्यास तयार आहोत, अशा मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत .