अठरा गावांमधील १३ नगरसेवकांचे पद रद्द

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून काही दिवसांपूर्वी अधिसूचना द्वारे १८ गावे  वगळण्यात आली. या वगळण्यात आलेल्या १८ गावांतील १३ नगरसवेकांचे पद निवडणूक विभागाच्या अहवालानुसार मनपा आयुक्तांनी रद्द केले आहे.  

यामध्ये या १८ गावातील नगरसेवक मोरेश्वर भोईर, पिसवली (भाजपा), रमाकांत पाटील गोळवली (भाजपा), नगरसेविका सोनी अहीरे, आशेळे, चिंचपाडा (बसपा), उर्मिला गोसावी, चिंचपाडा, नांदवली (शिवसेना), कुणाल पाटील, आडवली ढोकली (अपक्ष), प्रमिला पाटील, सोनारपाडा (शिवसेना),  प्रभाकर जाधव  घेसर, निळजे (अपक्ष), दमयंती वझे  माणगाव सोनारपाडा (अपक्ष), जालिंदर पाटील उंब्रोली, भाल, दावडी (भाजपा), इंदिरा तरे  आशेळेगाव कुष्णनगर (भाजपा), विमल भोईर, मानेरे, वसार (शिवसेना), शैलजा भोईर,  हेदुटणे,चोळे, (अपक्ष), सुनिता खंडागळे, गोळवली, पिसवली (भाजपा) या १३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत असणाऱ्या २७ गावांपैकी घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा आणि कोळे ही १८ गावे पालिका क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. तर उर्वरित आजदे, सागाव, नांदीवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा ही ९ गावे पालिका क्षेत्रातचा ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दरम्यान सध्या अस्तित्वात असणाऱ्या केडीएमसीतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ यावर्षी ११ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच ही कार्यवाही करण्यात आल्याने हे लोकप्रतिनिधी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत.

पक्षीय बलानुसार भाजपा ५, शिवसेना ३, अपक्ष ४, बसपा १, असे १३ नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. तर याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता १३ नगरसेवकांचे पद रद्द केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.