ठाकरे सरकारच्या कामगिरीवर देवेंद्र फडणवीसांनी ओढले ताशेरे

राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. त्यामुळे याबाबतीत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील सद्यस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी सरकारच्या कामगिरीवर भाष्य केले.

फडणवीस यांनी सरकारच्या उपाययोजनांवर टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सातत्याने २० टक्के संसर्ग दर आहे. देशापेक्षा आणि अन्य राज्यांपेक्षा तो कितीतरी जास्त आहे. काल तर संसर्गाचा दर २५ टक्के होता. ही स्थिती भयावह आहे.

त्यांनी पुढे असे म्हटले की, हे जम्बो कोविड सेंटर आपण काढले आहेत ते कोविड सेंटर आहेत की, कुणाला फायदा व्हावा म्हणून तयार केलेली सुविधा आहे, असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला, हे नेहमी बाहेर आले आहे. बीकेसी कोविड सेंटरबाबत कालच मी वर्तमानपत्रात बातमी वाचत होतो की, गेल्या महिन्यातील त्याठिकाणचा मृत्यूदर ३७ टक्के आहे. त्यामुळे हे कोविड सेंटर आहे की, मृत्यूचं आगार आहे. आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मरत असेल, तर मग या कोविड सेंटरमध्ये नेमकं चाललं काय?  आपण हे का सुरू केले आहे. तिथल्या एकूण संख्येच्या ३७ टक्के लोक कोविड सेंटरमध्ये येऊन मरत आहेत. ही अवस्था विदीर्ण अशी आहे. हे का होतंय, याकडे कुणी बघितलंय का?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

फडणवीस म्हणाले की,२४ मार्च रोजी गेल्या अधिवेशनाचा निरोप घेतला, तेव्हा रूग्णसंख्या २८ होती. आणि आज ९.२५ लाख आहे. सर्वाधिक पोलीस प्रभावित झाले. आरोग्य कर्मचार्‍यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सुद्धा महाराष्ट्रात अधिक आहे. महाराष्ट्र कोरोनात नंबर १ होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. आम्ही कोरोनाची स्थिती काहीही दाखवत असू. पण चित्र वेगळे आहे. मुंबईत आपण ७५०० मृत्यू दाखवितो आहोत. पण, प्रत्यक्षात १५ हजार मृत्यू झाले आहेत.
आपण संख्येशी लढतो आहोत, कोरोनाशी नाही, असेही फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राज्यात केवळ ९००० लोकांना महात्मा फुले जनारोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. गरिबाला कुठलीही मदत नाही, त्याच्यावर मरणाची वेळ आली आहे. कारण २०-२० लाख रूपये बिलं लादली जात आहेत. आठ-आठ दिवस टॉयलेटमध्ये पेशंट मरून पडले आहेत. कुणाला कळत नाही, हे किती गंभीर आहे. शासनाचे निर्णय जमिनीवर नसतात, केवळ कागदावर असतात, तेव्हा ही स्थिती येते. ज्याच्या खिशात पैसे नाही, त्याला मरणासाठी सोडून देण्यात आले आहे. बेड प्रचंड आहेत, असे सांगितले जाते. पण, तेथे कोणतीही व्यवस्था नाही. मरणाशिवाय या सरकारने कोणताही पर्याय ठेवला नाही.