देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, कोरोना स्थितीबाबत करणार चर्चा

राज्यातील एकूणच कोरोना स्थितीबाबत देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत राज्य सरकारला पत्र पाठवून अनेक विधायक सूचना केल्या. मात्र आता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (devendra fadanvis will meet chief minister uddhav thakre)यांची समक्ष भेट घेवून चर्चा करणार आहेत.

  मुंबई:  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील वर्धा, अमरावती भागात गेल्या दोन दिवसांत दौरा करून कोविड-१९ बाबतच्या उपाय योजनांबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील एकूणच कोरोना स्थितीबाबत त्यांनी आत्तापर्यंत राज्य सरकारला पत्र पाठवून अनेक विधायक सूचना केल्या. मात्र आता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (devendra fadanvis will meet chief minister uddhav thakre)यांची समक्ष भेट घेवून चर्चा करणार आहेत.


  जिल्ह्यांना लससाठा पुरविण्यात यावा

  अमरावती जिल्ह्यात रेमडेसिवीर  इंजेक्शन आणि लशींची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब लक्षात घेता लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांना लससाठा पुरविण्यात यावा , अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

  अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोविड केअर युनिटला भेट देवून परिस्थितीचा आढावा फडणवीस यांनी घेतला. यावेळी फडणवीस यांनी कोरोना रुग्णांची संख्या, औषधांचा साठा, बेड्स, ऑक्सिजन पुरवठा तसेच लसीकरण मोहीम याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून तपशीलवार माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.

  मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेणार

  जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लशींची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांना लससाठा मिळायला हवा. तसे झाल्यास तुटवडा भासणार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून मागणी करणार आहे असे, असे फडणवीस म्हणाले.

  केंद्राकडून महाराष्ट्राला लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या आरोपांवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीच सांगितल्यानुसार, महाराष्ट्राने सर्वात जास्त लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे केंद्राकडून लस पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण करण्यात काही तथ्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. अमरावती जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला व संपूर्ण विभागातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली.

  डॉक्टरांशी संवाद

  सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांशी देखील संवाद साधत त्यांच्याकडून घडत असलेल्या रुग्णसेवेचे कौतुक केले. यावेळी अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, आमदार रवी राणा, सभागृह नेते तुषार भारतीय, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, दिनेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.