भिवंडीच्या धामणकर नाका मित्र मंडळाचा थ्री डी डिजिटल गणेशोत्सव

भिवंडी: यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादूर्भामुळे देशासह संपूर्ण महाराष्ट्रात लाखो नागरीक बाधित झाले असून अनेक नागरीकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अशा संकटसमयी शासन, प्रशासन यासोबतच प्रत्येक नागरिकाची जबाबदारी कोरोनाला रोखण्याची आहे. त्यामुळे यंदाच्या सर्व धर्मीय धार्मिक उत्सव ,सण साजरे करण्यावर सामाजिक अंतर राखण्याचे निर्बंध आले आहेत. या नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा या सामाजिक संस्थेच्यावतीने साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने व कोरोना संदर्भात काळजी घेऊन थ्री डी डिजिटल देखावा उभा करून सर्व गणेशभक्तांना घर बसल्या गणेश दर्शन घडविणार आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन काल सायंकाळी करण्यात आले होते.या प्रसंगी मंडळाचे सरचिटणीस मोहन बल्लेवार,विजय गुज्जा,दिलीप पोद्दार,संजय भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षीच्या साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या भव्यदिव्य देखाव्याच्या परंपरेला बाजूला ठेवून अत्यंत छोटा मंडप बनवून अडीच फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश मंडपात दर्शनाकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नसून त्यांना घरबसल्या दर्शनाची व्यवस्था युट्युब व फेसबुकसह केबल प्रक्षेपणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गणेश मंडपात कार्यकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सॅनिटायझर,थर्मोटेस्ट ,पल्स ऑक्सीमिटर तपासणी करणे,हातमोजे,मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोना संकटात रुग्णांना रक्ताची अधिक गरज भासत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात दहा दिवस ठाणे येथील वामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने भारतरत्न स्व.अब्दुल कलाम महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये २१०० रक्तदात्यांच्या रक्त संकलनाचा संकल्प केला आहे. त्यासोबत या गणेशोत्सव काळात नेत्र चिकित्सा, मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून नागरीकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलीस दल यामधील कर्मचारी, अधिकारी हे कोरोनाबाधित झाले. मात्र त्यावर मात करीत ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. अशा कोरोना योद्धा कर्मचारी, अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान व त्यासोबत सेवा कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सन्मानदेखील करण्यात येणार आहे,अशी माहिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली आहे.