पीकविमा भरताना येणारी अडचण धनंजय मुंडे यांनी सोडवली

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० साठी पीकविमा भरण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी उरलेला असताना ज्या गावांची नावे विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळे दिसत नव्हती, त्या गावच्या शेतकऱ्यांची अडचण पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोडवली आहे.

बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० साठी पीकविमा भरण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी उरलेला असताना ज्या गावांची नावे विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळे दिसत नव्हती, त्या गावच्या शेतकऱ्यांची अडचण पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोडवली असून, त्या गावांची नावे पोर्टलमध्ये तात्काळ समाविष्ट करून तसेच एखाद्या शेतकऱ्याचे नाव पोर्टलवर दिसत नसल्यास त्यांचा पीकविमा बँकेने ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 

बीड जिल्ह्यातील जवळपास ९ गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असल्यामुळे एकही शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी तात्काळ आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार विमा पोर्टलवर अडचण येणाऱ्या आष्टी तालुक्यातील मोरेवाडी, वंजारवाडी, माजलगाव तालुक्यातील सुल्तानपूर, शिंदेवाडी, चिंचगव्हान, बीड तालुक्यातील पोखरी मैंदा, पोखरी घाट, आनंदवाडी, अंबेजोगाई तालुक्यातील अंबलवाडी तसेच गेवराई तालुक्यातील सावरगाव या गावांच्या बाबतीतील तांत्रिक समस्या तात्काळ दूर करून शेतकऱ्यांचा विमा हफ्ता संबंधित बँकांनी स्वीकारावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच काही शेतकऱ्यांचे सात – बारा महाभूलेख पोर्टलला संलग्न होण्यास अडचण येत होती, अशा शेतकऱ्यांचा पीकविमा सुद्धा संबंधित बँकांनी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावा व संबंधित विमा कंपनीकडे वर्ग करावा असे या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्यास केवळ दोनच दिवस उरले असून प्रशासन व बँकांनी शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करून सर्व विमा प्रस्ताव स्वीकारावेत, एकही पात्र शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत, उरलेल्या शेतकऱ्यांनी आपला विमा हफ्ता सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून विहित वेळेच्या आत भरून घ्यावेत असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.