पवारांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा- राहुल गांधींविरोधातील कट

लवकरच शरद पवार(sharad pawar) युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असा दावा केला जात होता. मात्र, या चर्चेच्या माध्यमातून काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम(sanjay nirupam) यांनी केला आहे.

मुंबई: राज्यात आणि देश पातळीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar) यांचे नाव चर्चेत आहे. यामागाचे कारण म्हणजे गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडी(UPA) अर्थात युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असा दावा केला जात होता. मात्र, या चर्चेच्या माध्यमातून काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम(sanjay nirupam) यांनी केला आहे.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरू आहे. शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्ठी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधींकडेच
संयुक्त पुरोगामी आघाडीचे(संपुआ) नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांची जागा घेणार असल्याचे वृत्त अफवा असल्याचा खुलासा काँग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर यांनी केला आहे. हे वृत्त म्हणजे विरोधकांमध्ये गैरसमज पसरवून गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा आणि विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शरद पवारांनेही दिले स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसनेही शरद पवारांसंबंधीच्या बातम्या निराधार असल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे. संपुआ अध्यक्षाबाबत दाखविल्या जात असलेल्या सर्व बातम्या खोट्या असून अशा बातम्या देऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी माध्यमांना दिला आहे.

दरम्यान, शरद पवार हे संपुआचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे. संपुआला मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदही मिळवता आले नाही, हेही सत्य आहे. सध्या राजकारणाच्या परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे विरोक्षी पक्षांनी एकत्र येऊन संपुआला मजबूत केले पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. देशात एक मजबूत फ्रंट हवा आहे, याच नेतृत्व कोण करणार ही एक मोठी गोष्ट आहे, असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले आहे.