rape

भिवंडी: कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना भिवंडीत घडली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केला असल्याची  घटना समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टर विरोधात मंगळवारी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केली असता या डॉक्टरवर विविध कलामांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 अल्पवयीन मुलगीची व तिच्या आईची तब्येत बरी नसल्याने दोघीही गुलजार नगर येथील डॉ बदरुजमा खान यांच्याकडे ३० जुलै रोजी उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने दोघींनाही तपासून व उपचार करून परत दुसऱ्या दिवशी तपासण्यासाठी बोलावले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी मुलीची तब्येत बरी नव्हती मात्र घरी काम असल्यामुळे मुलीच्या आईने तिच्या सोबत १० वर्षाच्या मुलाला सोबत पाठवले होते. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान डॉ बदरुजमा खान याने मुलीचा तपासणीचा नंबर येऊनही तिला तपासले नाही . तिला सर्वात शेवटी तपासण्यासाठी बोलावले व दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालादेखील कामानिमित्त बाहेर पाठवले होते . मुलीच्या सोबत गेलेल्या लहान भावाला पैसे सुट्टे आणण्याच्या बहाण्याने घरी पाठवले होते. यादरम्यान दवाखान्यात कुणीही नसल्याचा फायदा उचलत या डॉक्टरने मुलीवर अत्याचार केला .हा प्रकार पीडित मुलीने आपल्या मावशीला सांगितला असता मावशीला धक्काच बसला व तिने पीडित मुलीच्या आईला आपल्या घरी बोलावून हा प्रकार कथन केला. याप्रकरणी मुलीच्या आईने घटनेच्या पाच दिवसानंतर  ४ ऑगस्ट रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्या डॉक्टरबाबत तक्रार केली असता शांतीनगर पोलिसांनी डॉक्टर विरोधात  बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र डॉक्टरला अजूनही अटक केली नसून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे.