covid hospital

कल्याण : डोंबिवली पूर्व येथील डोंबिवली जिमखान्‍याच्‍या बास्‍केट बॉल कोर्टाच्‍या जागेवर उभारलेल्‍या कोविड रुग्‍णांसाठी समर्पित रुग्‍णालयाचा ऑनलाईन लोकर्पण सोहळा उद्या दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते संपन्‍न होणार आहे.

या रुग्णालयात ७० बेड आयसीयू, ५१ बेड ऑक्‍सीजन सुविधा उपलब्‍ध असणार असून त्‍यातील ०३ बेड डायलिसीस रुग्‍णांकरीता राखीव ठेवण्‍यात आलेले आहेत. याव्‍यतिरिक्‍त ३० व्‍हेंटीलेटर आणि ५ ऑक्सिजन मशीनची सुविधा देखील उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. कोविड रुग्‍णांसाठी समर्पित रुग्‍णालयात रुग्‍णांसाठी अत्‍याधुनिक व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून संपूर्ण रूग्‍णालय हे वातानुकुलित व इंटरनेट सुविधायुक्‍त आहे. त्‍याचप्रमाणे रुग्‍णांसाठी खास सुरेल संगीताची व्‍यवस्‍थादेखील करण्‍यात आलेली आहे.

या रुग्‍णालयामध्‍ये रुग्‍णांसाठी वॉटर डिस्‍पेंसर उपलब्‍ध करुन देण्‍यात आले असून यामधून थंड/गरम/साधं जलपान रुग्‍णांसाठी उपलब्‍ध होईल. त्‍याचप्रमाणे या रुग्‍णालयात रुग्‍णांसाठी गरम पाण्‍याचे शॉवर, स्‍वच्‍छता गृह व शौचालयात एक्‍झास्ट  फॅनची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. सुरक्षेसाठी सर्वत्र सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरे बसविण्‍यात आले असून ग्रीन झोनमध्‍ये रजिस्‍ट्रेशन काऊंटर, रिसेप्‍शन, सीसी टीव्‍ही. रुम, औषध भांडार विभाग, मिटींग रुम इत्‍यादींची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

रेड झोनमध्‍ये नर्स स्‍टेशन, एक्‍स रे रुम, पॅथालॉजी रुम, बॉयोमेडिकल वेस्‍ट ठेवण्‍यासाठी स्‍वतंत्र रुम, डॉफिंग रुम, फार्मसी रुमची सुविधा करण्‍यात आलेली आहे. या रुग्णालयात फायर एक्स्टींगविशर बसविण्यात आले असून फायर एक्झीटची सुविधा देण्यात आलेली आहे. हे रुग्‍णालय ओम साई आरोग्‍य केंद्र, मुंबई यांच्यामार्फत चालविले जाणार आहे.