government office

सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेस कोड लागू(dresscode for government employees) करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने आज जाहीर केले आहेत.

काही दिवसांपुर्वी साई मंदिरात म्हणजेच साईंच्या दरबारात ड्रेसकोड असावा, असा नियम जाहीर करण्यात आला होता. त्यावरून वादंग उठले आहे. अशातच साई दरबारानंतर सरकार दरबारीही काम करणाऱ्यांनाही आता ड्रेसकोडचे बंधन(dresscode for government officers and workers) घालण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत,याबाबतचे निर्देश राज्य सरकारने आज जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल असे कपडे घालत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम   कामकाजावरही होत असतो. या सगळ्या बाबी विचारात घेऊन मंत्रायलय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

या आहेत मार्गदर्शक सूचना

१) गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.

२) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपडे घालावेत.

३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.

४) कार्यालयामध्ये स्लिपर वापरू नये.

५) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा घ्यावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.

६) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.