दहिहंडी उत्सव साजरा होणार नसल्याने भिवंडीतील गोविंदा पथकांचा हिरमोड

भिवंडी : अवघ्या तरुणाईला साद घालणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असून त्यामुळे भिवंडी शहरातील प्रमुख दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी दहीहंडी न उभारण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील गोविंदा पथकांचा हिरमोड झाला असून यंदा साजरा न होणार दहीहंडी उत्सव पुढील वर्षी अधिक उत्साहाने साजरा करण्याचा मनोदय बोलून दाखविला.   

 मार्चपासून राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्गाच्या भीतीने धार्मिक व सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास बंदी घालण्यात आली असल्याने गुढीपाडव्यानिमित्त निघणारी नववर्ष स्वागत यात्रा ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक, मुस्लिम धर्मियांची रमजान व बकरी ईद शहरात कोणताही उत्सव साजरा न करता प्रत्येकाने घरातच साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने रात्री काही मोजक्या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत जन्माष्टमी साजरी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी साजरा होणारा दहीहंडी उत्सवसुद्धा साजरा केला जाणार नसल्याची माहिती युवा शक्ती मित्र मंडळ दहीहंडी उत्सवाचे आयोजक यशवंत टावरे यांनी दिली आहे .

प्रत्येक वर्षी जन्माष्टमी व दहीहंडी नारपोली भंडारी चौक या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पूजा करून हजारोंच्या उपस्थितीत साजरी होते. मात्र यंदा जन्माष्टमी सोहळा कार्यालयात पाच जणांच्या उपस्थितीत करून पुढील वर्षी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करण्याचा मनोदय यशवंत टावरे यांनी बोलून दाखविला. त्यासोबत भादवड येथील स्व महेंद्र समाजकल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून होणारा उत्सव रद्द करून त्यावर खर्च होणाऱ्या पैशातून भिवंडी शहरातील जनतेकरीता एक रुग्णवाहिका लोकार्पण करणार असल्याचे  माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी सांगितले. कपिल पाटील फाऊंडेशनची शिवाजी चौक येथील दहीहंडी, अंजुरफाटा येथील राज मित्र मंडळाची दहीहंडी या शहरातील मनाच्या दहीहंडी रद्द केल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे .  

दहीहंडी उत्सवासाठी तब्बल एक महिना आधीपासून सरावाच्या तयारीस लागणारे गोविंदा पथक यांनीसुध्दा कोरोना संकट काळात शांत बसून राहण्यात समाधान मानले असून या पथकांमध्ये सहभागी युवकांचा हिरमोड झाला असून शहरातील ज्ञानदीप मित्र मंडळ नागाव ,आम्ही शेलरकर ,शेलार ,डायमंड जिमको चावींद्रा हे शहरातील मुख्य गोविंदा पथक असून त्यांनी आपापल्या मंदिरात सामाजिक अंतर राखीत फक्त जन्माष्टमी साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ज्ञानदीप मित्र मंडळ नागाव चे मुख्य शरद धुळे यांनी दिली आहे .