केळवे समुद्रकिनाऱ्याची होतेय धूप

पालघर: पालघर तालुक्यातील केळवे(kelwe) गाव येथील शितलादेवी मंदिर व समुद्र चौपाटी(beach) पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे केळवे किनारपट्टी परिसरातील किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप होते आहे. यामुळे समुद्र किनारा भूभागाकडे पुढे पुढे सरकत आहे. ही बाब गंभीर असून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी केळवे येथुल समाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभोतेंडुलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करून आपण या समस्येकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना आखाव्यात अशी विनंती करून धूप झालेल्या भूभागाचे जीपीएसव्दारे टॅग केलेले फोटो ही मेल केले आहेत.
प्रथमेश प्रभो तेंडुलकर यांच्या मते, आता या समस्येवर उपाययोजना आखल्या नाही तर वेळ निघून गेलेली असेल. एका बाजूला जागतिक तापमानात वाढ (ग्लोबल वाॅर्मिंग) होत आहे. तर दुसऱ्या बाजूला समुद्रात माती भराव टाकून अतिक्रमण केले जात आहे. यामुळे समुद्राचे पाणी समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात शिरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केळवे समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप ही प्रचंड आहे. या ठिकाणी एक दोन वर्षांपूर्वी असलेली सुरूची झाडे मुळासकट उन्मळून पडून समुद्रात वाहून गेली आहेत. या भागाची जास्त धूप होऊ नये यासाठी या भूभागात दोन वर्षांपूर्वी सुरुची झाडे लावण्यात आली होती. या झाडांनी हा भाग बहरलेला असतानाच आजच्या स्थितीला नामशेष होत चालला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणतज्ञांना पाठवून योग्य त्या उपाययोजना अंमलात आणाव्यात अशा संदर्भाचे पत्र व जीपीएस टॅग फोटो मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत, असे प्रथमेश यांनी सांगितले.