२ महिने होऊनही नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाईची प्रतिक्षा

३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाला सोमवारी दोन महिने पूर्ण झाले. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप शंभर टक्के भरपाई मिळाली नाही.

म्हसळा : ३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाला सोमवारी दोन महिने पूर्ण झाले. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप शंभर टक्के भरपाई मिळाली नाही. यामुळे नागरिकांमध्ये सरकार विरोधात रोष वाढत आहे.

श्रीवर्धन केंद्रबिंदू असणार्‍या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तीन तालुक्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या वादळात परिसरातील ८०% नागरिकांचे संपूर्ण घर, घरावरील कौलं, पत्रे उडून गेले होती. अनेक शेतकरी, बागायतदारांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टाळेबंदीच्या काळात हातामध्ये कामधंदा नसताना देखील, लाखो रुपयांचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. असे असताना देखील शासनाकडून तुटपुंजी मदत (लाखो रूपयांच्या नुकसानाला चौदा हजार रुपये) मिळाली असून काही नुकसानग्रस्त दोन महिन्यांनंतरही अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

म्हसळा नगरपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळामुळे रस्त्यालगत पडलेली झाडे व कचरा अद्याप उचलला गेला नसून, या कचर्‍यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई देण्याबाबत शासन अद्याप उदासीन असल्याने बागायतदार व नुकसान ग्रस्तांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही शासन तुटपुंजी मदत देत आहे आणि ही मदत नागरिकांच्या बँक खात्यात वेळेत जमा होत नाही. याबाबत महसूल विभागाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्ही शासनाच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हसळा शाखेच्या खात्यात मंजूर रक्कम वर्ग केलेली आहे असे सांगण्यात आले आहे.