माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते कल्याणमध्ये रामाचे पूजन

 कल्याण : अयोध्या येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम येथेही अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, नागरिकांनी महापूजा, आरती व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी उपस्थिती लावत प्रभू रामचंद्रांची पूजा केली.

गेली ५०० वर्षाचा प्रभू रामाचा वनवास आज खऱ्या अर्थाने संपला आहे, जिथे रामाचा जन्म झाला तिथे भव्य मंदिर उभे राहिले पाहिजे ही कोट्यावधी हिंदूंची भावना होती, ती आज पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने जनतेला राम मंदिराचे दिलेले वचन आज खऱ्या अर्थाने पूर्ण केले आहे, याच क्षणासाठी गेली कित्येक पिढ्या त्याग, प्रयत्न आणि संघर्ष करत होत्या. एक हिंदू म्हणून आजचा हा क्षण आपल्या सर्वांच्या अभिमानाचा, आस्थेचा आणि हिंदुस्थानाच्या प्रेरणेचा असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

कल्याण पश्चिम येथील आंबिवली, वडवली, अटाली, चिखलेबाग ,पारनाका, राम मंदिर, काळा तलाव आदी ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पराग तेली, रमेश कोनकर, भाजपाचे महेश चौधरी, सुहास चौधरी, एस. एम. जोशी, किशोर खैरनार, महेश केळकर, विद्या कुंटे, विजय पाटील, हनुमान तरे, संजय तरे, सुभाष पाटील, मिनेश पाटील, वितेश पाटील, मयूर पाटील, अनंता पाटील, अमर पाटील, दशरथ पाटील, आकाश पाटील, प्रताप टूमकर, शशिकांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.