विघ्नहर्त्याच्या आगमनाचा उत्साह पण बाजारपेठेत निरुत्साहाचे वातावरण

रोहन शिंदे, महाड :  गणरायाचे २ दिवसांमध्ये आगमन होणार आहे. देशावर कोरोनाचे अभूतपूर्व संकट कोसळलेले आहे. असे असले तरी अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने रायगडातील घराघरात गणरायांच्या स्वागताची तयारी सुरु आहे. कोरोनाचे देशावर कोसळलेले विघ्न विघ्नहर्ताच दूर करेल या विश्वासासह शासनाच्या नियम आणि अटींचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश भक्तांमध्ये उत्साह असला तरी बाजारपेठेतील वातावरण मात्र निरूत्साहीच आहे. पूजेचे साहित्य वगळता, सजावटीच्या साहित्याला फारशी मागणी नाही.

कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारने काही अटींसह परवानगी दिलेली आहे. गणरायांची मूर्ती चार फुटांपेक्षा अधिक उंच नसावी ही त्यातील मुख्य अट आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गर्दी होणार नाही याचीही दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. महाड शहरातील गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सवाला १०८ वर्षांची परंपरा आहे. या मंडळाने   गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी मंडळासाठी काम करणाऱ्या पण यावर्षी काम मिळू न शकलेल्या विविध छोट्या व्यावसायिकांना मदत करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. महाडमधील नूतन मित्र मंडळाचे हे ६३ वे वर्ष आहे. या मंडळाचा गणेशोत्सव महाडकरांचे खास आकर्षणाचा विषय  असतो. यावर्षी मात्र या मंडळाने साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोहीनूर मित्र मंडळ, रोहिदास तरूण मित्र मंडळ यांनी देखील भपकेबाज पध्दतीने हा उत्सव साजरा न करता, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिलेला दिसून येतो. रायगड जिल्ह्यात २८७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या सर्वच मंडळांनी यावर्षी साधेपणापणावर भर देत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्ह्यात १ लाख २३९ घरगुती गणपती येतात. यावर्षी पूजा, आरतीसाठी निमंत्रणे न देण्याकडे अनेक कुटुंबांचा कल असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ परंपरा खंडीत होवू नये यासाठी घरातल्या घरात गणरायांची पूजा अर्चना करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचा फटका मात्र सजावटीचे साहित्य विकणार्या व्यापारी वर्गाला बसला आहे. महाडमधील सजावटीचे आणि रोषणाईचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, सजावटीच्या साहित्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ४० ते ५० टक्केच मागणी आल्याचे तर रोषणाईच्या साहित्याला जेमतेम पाच ते दहा टक्केच मागणी आल्याने खरेदी केलेला मालही पडून राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

गणेश मूर्तींचे आगमन होताना आणि विसर्जनाच्या वेळेस खालूबाजाच्या निनादात निघणाऱ्या मिरवणुका निघणार नाहीत. त्याचा फटका  वादकांना मात्र मोठ्या प्रमाणावर बसला आहे. गणेशाची स्थापना करण्यासाठी पुरोहित येण्याची शक्यता कमी असल्याने ऑनलाईन किंवा रेकॉर्डेड पुजाविधींनीच गणेशाची पूजा केली जाणार असल्याचेही अनेकांनी सांगितले.

गणेशोत्सावाच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना एस.टी.ने विशेष सेवा उपलब्ध करून दिली. मात्र या सेवेचा लाभ घेण्यासाठी चाकरमान्यांना किमान दहा दिवस आधी गावी पोहोचण्याचे आणि दहा दिवस क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने चाकरमान्यांनी एस.टी.सेवेचा लाभ फारसा घेतलेला नाही. परतीच्या प्रवासासाठीचे अनेक निर्बंध राज्य शासनाने शिथिल केले आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासात चाकरमान्यांना एस.टी.चा फायदा होणार आहे. दुसरीकडे खाजगी वाहनांनी, खाजगी बसेसनी रायगडसह कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असल्याने गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावरील वाहतुकीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. व्यापारी, भाजीविक्रेते, पेट्रोलपंपांवरील कर्मचारी, दुकानांमध्ये काम करणारा नोकर वर्गाने या काळात अँटीजेन किंवा स्वॅब चाचणी करून घेण्याच्या सूचना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. या चाचण्यांची संख्या वाढणार असल्याने रूग्ण संख्येमध्येही वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक सूचनांचे काटेकोर पालन करून हा उत्सवव साजरा करण्यात येणार असला तरी सामान्य गणेश भक्ताच्या उत्साहावर मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही हे निश्चित.

रायगड जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षेत्रामध्ये महाड तालुक्यात ५ हजार ७४५, पोलादपूर तालुक्यात १ हजार ८१०, माणगाव तालुक्यात १० हजार ४३१, म्हसळा तालुक्यात २ हजार ५०९, श्रीवर्धन तालुक्यात ८ हजार ७८८, मुरुड तालुक्यात ५ हजार १५६, तळा तालुक्यात ४ हजार १९८, रोहा तालुक्यात ६ हजार ६३४, सुधागड ४ हजार २२२, अलिबाग १९ हजार ३८५, पेण ११ हजार २२५, कर्जत ९ हजार ४३, खालापूर ५ हजार ९८ तर पनवेल तालुक्यातील मात्र रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील रसायनी पोलीस ठाण्यात २ हजार २८६ घरगुती गणरायांची स्थापना होणार आहे.