रुग्णांना दिले जातेय अव्वाच्या सव्वा बिल, नगरसेवकाने उचलले ‘हे’ पाऊल

कल्याण : गेल्या १० दिवसांमध्ये पीपीई किटच्या ५०  हजारासह रुग्णालयीन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा खर्चदेखील खाजगी रुग्णालयकडून रुग्णाच्या माथी मारला जात असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात उघडकीस आला आहे. याबाबत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी थेट रुग्णालय गाठत अवाजवी बिल आकरणाऱ्या रुग्णालयाला धारेवर धरत पीपीई किट घालून रुग्णाला उचलून बाहेर आणले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत बिल कमी केले आहे. कोरोना काळात रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी पालिका आयुक्तांसह पालकमंत्र्यांकडे केली आहे.

कोरोना काळात रुग्णाची लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तंबी दिली असली तरी आजही काही खाजगी रुग्णालयांकडून लूट सुरूच आहे. कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयाने तर कहर केला. १०  दिवसांचे फक्त पीपीई किटचे चक्क ५० हजार रुपये तर आकारलेच मात्र त्याहून ही पुढे जाऊन रुग्णालयीन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्चदेखील रुग्णाच्या माथी मारला. बिलाचा फुगलेला आकडा पाहून रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. नगरसेवक गायकवाड यांना बिलाबाबत संशय आल्याने त्यांनी थेट रुग्णालय गाठले व रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.

सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने संतापलेल्या गायकवाड यांनी रुग्णालयाला धारेवर धरत अवाजवी आकरलेले बिल कमी करण्याची मागणी केली. या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र बिल भरल्याशिवाय रूग्णाला सोडण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने संतप्त गायकवाड यांनी पीपीई किट परिधान करत थेट रुग्णाचा वॉर्ड गाठत स्वतः रुग्णाला उचलून खाली आणले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रुग्णालय प्रशासन नरमले व बिल कमी केले.

 सर्वसामान्य नागरिक आधीच कोरोनामुळे धास्तावेलेले असताना आता रुग्णलयाकडून लूट सुरू असून पीपीई किट सह आता चक्क रुग्णालयीन कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याचा खर्च देखील रूग्णाच्या माथी मारला जात आहे. हे अन्यायकारक असून याबाबत पालिका आयुक्तांना अवाजवी बिल आकारणीबाबत कारवाई करण्याबाबतचे पत्र दिले आहे. तसेच पालकमंत्र्यांची भेट घेत अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.  याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता काल रुग्णासह राजकीय कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीनुसार बिल कमी केलं होतं आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.