पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

तलासरी: पालघर जिल्ह्यात जवळपास एक महिन्यापासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पालघर जिल्ह्यात पावसाला जूनमध्ये सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावणीला लवकर सुरुवात केलेली होती. धान्य तयार होण्यासाठी लागणारा कालावधी तीन महिन्यांचा पूर्ण झाला असून पाऊस अजूनही मुसळधार सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील सूत्रकार गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.सूत्रकार गावातील शेतकऱ्यांचे काही शेतातील धान्य काही ठिकाणी काढलेले आहे तर काही ठिकाणी भात पाण्यातच बुडून राहिल्यामुळे कुजून खराब झालेला आहे.
तलासरी तालुक्यात अजूनही रिमझिम पाऊस सुरूच असल्याकारणाने शेतात नवीन तयार होणारे धान्याच्या कणसामध्ये पाणी जात असल्यामुळे धान्य तयार होण्याअगोदरच खराब होत आहे. त्याचबरोबर राबामध्ये लावलेली कडधान्य – तूर, उडीद, चवळी, ज्वारी इत्यादी अतिपावसामुळे राबातच कुजून खराब होऊ लागले आहेत.
आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा योजनेविषयी माहिती नसून खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा केलेला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेतात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळू शकत नाही म्हणून आदिवासी भागातील सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पीक विमा करून घ्यावा आणि पीक विमा योजनेचा लाभ घेऊन नुकसान भरपाई मिळवावी असे आवाहन केले जात आहे.