फास्ट टॅग नसेल तर दुप्पट पडणार टोल, या तारखेपासून राज्यात फास्ट टॅग अनिवार्य

नव्या वर्षाच्या प्रारंभीच चारचाकी वाहनांवर फास्ट टॅग अनिवार्य(fast tag compulsory in maharashtra करण्यात आला असून फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनांना टोल नाक्यावर दुप्पट टोलचा भुर्दंड भरावा लागणार आहे.

ठाणे : नव्या वर्षाच्या प्रारंभीच म्हणजेच १ जानेवारीपासून चारचाकी वाहनांवर फास्ट टॅग अनिवार्य(fast tag compulsory in maharashtra करण्यात आला असून फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनांना टोल नाक्यावर दुप्पट टोलचा भुर्दंड भरावा लागणार आहे. तर टोल कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी याची तयारी सुरु केली असून जानेवारीपासून टोलनाके हे कॅशलेस होणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात माहिती दिली.

आजही टोलनाक्यावरून जाणाऱ्या गाडयांना पाहता २५ टक्के वाहनं फास्ट टॅग नसल्याचे समोर आले आहे. टोल कर्मचाऱ्यांमार्फत वाहनचालकांमध्ये आणि मालकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. टोलनाक्यावरच टोल कंपनीचे प्रतिनिधी हे फास्ट टॅगची औपचारिकता पूर्ण करतील. फास्ट टॅगसाठी काही बँकांनीही आपले केम्प्स लावलेले आहेत. टोल नाक्यावर वाहनांकडून टोल घेताना लांबच्या लांब रांगा लागतात त्यामुळे नागरीकांचा नाहक वेळ वाया जातो. जर फास्ट टॅग प्रत्येक वाहनांना लावले गेले तर टोल नाक्यावर वाहकूत कोंडी होणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत देखील होईल आणि टोल नाक्यावर वसूल केल्या जाणाऱ्या पैशांची मोजदाद करणे देखील सोयीस्कर होईल त्यामुळे प्रत्येक गाडीवर फास्ट टॅग असणे गरजेचे असल्याचे मत नगरविकासमंत्री(उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मुंबईतील टोल नाके असो किंवा एक्सप्रेस वे वरील टोल नाके असो  सर्वच ठिकाणी टोल नाक्यावर टोल वसूलीमुळे मोठी वाहकूत कोंडी होते. यामुळे वेळ आणि इंधन तर वाया जातेच पण पर्यावरणाचा देखील ऱ्हास होतो. त्यात विनाकारण हाॅर्न वाजवून अनेक वाहन चालक ध्वनी प्रदुषणही करतात. तर टोल वरुन वाहन चालक आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी, धक्काबुक्की आणि शिविगाळीचे प्रकार वाढतात.  हे सर्व टाळण्यासाठी गेली वर्षभर फास्ट टॅग सक्तीचे करण्यात आले होते. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावरुन जाणाऱ्या एकूण गाड्यांना पैकी अंदाजे ५० टक्के गाड्यांनीच फास्ट टॅग लावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जोपर्यंत फास्ट टॅग सक्ती केली जात नाही तोपर्यंत टोल नाक्यावरील वाहकूत कोंडी कमी होणार नाही हाच हेतू आणि टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे. नव्या वर्षात आता सर्व गाड्यांना फास्ट टॅग सक्तीचे करण्यात आल्याचे नगरविकासमंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितले.