खडवली येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कल्याण : संपूर्ण देशासह राज्य कोरोनासारख्या महामारीच्या भीषण संकटाला सामोरे जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने शर्थीचे  प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत आपल्या जीवाचीही पर्वा न करता सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार, आशा व अंगणवाडी सेविका हे  कोरोना योद्धे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अशा या कोरोना योद्ध्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली येथे सन्मान करण्यात आला.  

कोरोनाच्या कठीण प्रसंगातही अत्यंत तळागाळातील जनसामान्यांपर्यंत सेवा देण्याचे कार्य हे करत असून  त्यांचे मनोबल, आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, त्यांच्या कार्यात त्यांना प्रेरित करणे या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, खडवली येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार तसेच जनसामान्यांच्या घरोघरी जाऊन कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर कार्य करणाऱ्या सदर परिसरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा या सर्वांचा  हातमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना ठाणे ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खामकर, वसंत लोणे, पंचायत समिती उपसभापती रमेश बांगर, प्रकाश चौधरी, अल्पेश भोईर, सुनील भोईर, अनिल चौधरी, मनीषा मुकणे, सरपंच,  वैभव दलाल, समीर शेलार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.