गोदामांसाठी नैसर्गिक नाले बुजविल्याने भिवंडीत अनेक ठिकाणी पूर

भिवंडी: भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावला आहे. स्थानिक पुढारी , जमीन मालक व विकासक यांच्याकडून गोदामांचे बांधकाम करताना परिसरातील नैसर्गिक नाले बुजवून त्या नाल्यांवर अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्याच्या गावखेड्यातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

रात्रीपासून  मुसळधार पाऊस पडत असल्याने नाल्यांमधील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने पावसाचे पाणी दापोडा ग्रामपंचायत तसेच सारंग गांव ,शेलार,खोणी ,माणकोली गावच्या हद्दीतील अनेक बंगले, घरांमध्ये पावसाचे  पाणी शिरल्याने नागरीकांची एकच त्रेधातिरपीट उडाली त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दापोडा गावाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाचे बांधकाम खाडी क्षेत्रात अनधिकृत बांधकामे केले आहे. त्याविरोधात नागरिकांनी महसूल विभागाकडे अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मात्र विकासकांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे कारवाई केली जात नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून परिसरातील खाडीचे परंपरागत नालेसुध्दा माती भराव टाकून बुजवून टाकले आहेत. त्यामुळे हे पावसाच्या पुराचे पाणी गावांमध्ये शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.