महाडमध्ये ३६ तासांनंतरही पूरस्थिती कायम, अनेक गावांचा संपर्क तुटला

महाड : महाड तालुक्याम गेल्या ४८ तासांत सुरु असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे महाड शहरामध्ये निर्माण झालेली पूरस्थिती ३६ तासांत जैसे थेच आहे. मुख्य बाजारपेठेसह शहराच्या निम्या भागांत पुराचे पाणी घुसले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तटरक्षक दलाची एक तुकडी आणि स्थानिक पातळीवर महाड नगरपालिकेचे बचाव पथक तैनात ठेवण्यात आले आहे. शहरातील धोकादायक भागांमध्ये राहणाऱ्या सुमारे २५० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

महाबळेश्वर येथे उगम पावणारी सावित्री आणि रायगड परिसरातून वाहणारी गांधारी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून दुथडी भरून वाहत आहेत. या दोन्ही नद्याचां संगम महाड शहरामध्ये असल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ३६ तासांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ, दस्तुरी नाका, सुकटगल्ली, गाडीतळ, भीमनगर कोटेश्वरी तळे, गांधारी नाका या भागांमधील पुराचे पाणी हललेले नाही.

गेल्या ४८ तासांमध्ये २४८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून अद्याप संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गांवाचा संपर्क तुटला असून दळणवळणावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. पावसाचा वाढता जोर पाहता आता महापूरापेक्षा तालुक्यावर दरडींची टांगती तलवार लटकत आह. यामुळे आता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरल आहे.

 महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार चंद्रसेन पवार, मुख्याधिकारी जीवन पाटील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज महाडचे आमदार भरत गोगावले यांनीही संपूर्ण शहरासह तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा आणि उपाययोजनांची माहिती घेतली. 

अतिवृष्टी आणि महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क आहे. महाडसारख्या संवेदनशील भागाचा विचार करता येथे तटरक्षक दलाचे पथक तैनात ठेवण्यात आल आहे. या दलाचे दोन अधिकारी, १० जवानांचे पथक, ट्रक, लाईफ बोट , लाईफ जॅकेट, व्हिएचएफ सेट , या बचाव साहित्यासह महाड येथे दाखल झाले आहे. याखेरीज महाड येथाल एक वव्यावसायिक प्रशांत साळुंखे यांनी आपल्या पाच बोटी, पंधरा स्वंयसेवक, पंधरा लाईफ जॅकेट महाड नगरपालिकेला उपलब्ध करून दिल्या आहेत. नगरपालिकेच्याही दोन बोटी तैनात करण्यात आल्या असून त्यांची सातत्याने महाड शहरांत गस्त सुर आहे. गेल्या दोन दिवसांत शहरांत पुराचे पाणी असल्याने नागरिक व्यापारी आणि सखल भागांत राहणाऱ्या नागरीकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे.  तालुक्यात आतापर्यंत १४५० मि.मी. एवढा सरासरी पाऊस नोंदला गेला आहे.