विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचे मनपा आयुक्तांना साकडे

भिवंडी: राज्यात बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन दिले जात आहेत. मात्र भिवंडीतील मनपा शिक्षकांना आजपर्यंत सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळत नाही. जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग या सुधारित वेतनश्रेणी नुसार पूर्वलक्षी प्रभावाने वेतन देण्यासाठी ऑगस्ट २०१९  रोजी शासनाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांसाठी शासन निर्णय काढून एक वर्ष उलटले तरी आजही शिक्षकांच्या पदरी निराशाच असल्याने या सातव्या वेतन समस्यांबरोबरच मनपा प्राथमिक शिक्षकांच्या इतर अनेक समस्या सोडविण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य प्रा‍थमिक शिक्षक संघ भिवंडी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांची भेट घेतली व आपल्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन मनपा आयुक्तांना दिले.

शिक्षक संघटनेने केलेल्या या मागण्यांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करणे, तीन वर्षांपासूनची रखडलेली मेडिकल बिल, मुलीख्याध्यापक पदोन्नती, पदवीधर पदोन्नती, शिक्षण विभागासाठी शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, लिपिक यांची पूर्तता करणे. शिक्षकांना कायम आदेश, डीसीपीएस धारक शिक्षकांना एन. पी. एस. खाते सुरू करून मृत डीसीपीएस धारकांच्या वारसांना १० लाख रुपये तातडीची मदत, शिक्षकांना कोव्हिड १९ च्या कामातून कार्यमुक्त करणे. विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश, दप्तर उपलब्ध करून देणे या अशा विविध मुद्द्यांवर शिक्षक संघटनेने मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर शिक्षकांच्या सर्व मागण्यांची मनपा आयुक्तांनी दाखल घेतली असून लवकरच या समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासनदेखील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रा‍थमिक शिक्षक संघ भिवंडी शाखा अध्यक्ष सुनील गोतारणे यांनी दिली आहे. त्याच बरोबर येत्या दोन आठवड्यानंतर पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू असे आश्वासन देखील मनपा आयुक्तांनी संघटनेस दिले असल्याने मनपा आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रा‍थमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष योगेश पाटील, सचिव संतोष सुरवसे, असलम खान, जकी शेख, संघटनेचे सल्लागार शंकर भोईर, संजय भोईर, उपाध्यक्ष भालचंद्र भोळे, सहसचिव कृपेश मते, तिरूपती बुर्ला तसेच सदस्य राजेंद्र साळवे, समन्वय समितीचे मोहियुददीन सर, सादी सर, जावेद खान आदी उपस्थित होते.