माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि  माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान (९२) यांचे आज निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  राम प्रधान यांनी केंद्रीय गृह , संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल, अशा विविध भूमिका  बजावल्या होत्या.  

त्यांच्या निधनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाले असून त्यांनी  ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत म्हणून भरीव कामगिरी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून  प्रधान यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 दरम्यान, कॅबिनेटमंत्री जयंत पाटील , विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही  ट्विट करून प्रधान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राम प्रधान यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या हाताळत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.