‘गो कोरोना गो’ म्हणत रोहा- कोलाडमध्ये झाले गणपती विसर्जन

रोहा: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रोहा कोलाड विभागात आज अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन अतिशय शांततेत व भक्तीमय वातावरणात करण्यात आले. यावेळी गणेश भक्तांनी ‘गो कोरोना गो’ असा नारा दिला.

गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आगमन झालेल्या गणरायांचे अनंत चतुर्दशीला मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. रोहा कोलाड विभागातील विविध गावात घराघरात व सार्वजनिक मंडळ तसेच काही ग्रामस्थांनी आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षीही  गणेशाची स्थापना करुन नित्यनेमाने पूजा,आरती व अन्य धार्मिक कार्यक्रम यथायोग्य पद्धतीने पार पाडले. कोरोनामुळे सर्वच बाबतीत बंधने आली असल्याने सण-उत्सव साजरे करताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे चौकटीत साजरे करावयाचे असल्याने रोहा कोलाड विभागातदेखील शासकीय नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

दरवर्षी गणेशोत्सव कालावधीमध्ये उत्सवाचे आकर्षण म्हणून विविध धार्मिक तसेच समाज प्रबोधनात्मक देखावा तसेच चलचित्र दाखवले जातात. तसेच विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोना महामारीचा वाढत चाललेला प्रादूर्भाव पाहता अतिशय साध्या पद्धतीत व मनामध्ये भक्ती ठेऊन प्रत्येकाने हा उत्सव साजरा केला. तर आज अनंत चतुर्दशीला शांततेच्या वातावरणात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशाप्रकारे तसेच ‘गो कोरोना गो’ चा नारा देत भावपूर्ण निरोप देण्यात आला.