कल्याण ग्रामीण भागात वाढतायत कचऱ्याचे ढिगारे

कल्याण : कल्याण ग्रामीण भागात कचरा समस्या भीषण स्वरूप धारण करत आहे. कोरोना संकट सुरु असुन कोरोना प्रादुर्भावामुळे नागरिक मेटाकुटीला आले असुन वाढती कचरा समस्याही वाढत आहे.  त्यात ग्रामपंचायतींकडे स्वतःची कचरा टाकण्यासाठी जागा उपल्बध नसल्याने ग्रामपंचायत हद्दीत कचरा समस्या उग्र झाली आहे.  राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वर गेल्यावर शहाड सेन्चुरी गेटपासून हातगाडी भाजीपाला विक्रेत्यांकडून भाजीपाला कचऱ्याचे ढीग रस्त्यालगत टाकले गेले असल्याचे दृष्टीक्षेपात येते.

कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ , वरप, कांबा, रायते, गोवेली ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. मात्र त्यामानाने सुविधा उपल्बध होत नाहीत. म्हारल , वरप , कांबा  , रायते, गोवेलीसारख्या ग्रामपंचायतीकडे स्वत:ची कचरा टाकण्यासाठी जागा नाही. यात कांबा ग्रामपंचायतीने कचरा टाकण्यासाठी भाडेतत्वावर जागा  घेतली आहे तर इतर ग्रामपंचायती परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहेत. या ग्रामीण पट्यात मोठी संकुले उभारली जात आहे.  त्यामुळे नागरीकरण होऊन कचरा जास्त प्रमाणात निर्माण होत आहे. ग्रामपंचायती कडे कचरा टाकण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी भूखंड नसल्याने  म्हारळ,  वरप , रायते गोवेली  ग्रामपंचायती भागात राष्टीय महामार्ग क्र २२२ रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग जागो जागी दिसत आहेत त्यामुळे रस्त्याने चालताना दुर्गंधी येऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात कोरोना महामारीने ग्रामीण भागात पाय पसरायला सुरुवात केल्याने या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे .

कल्याण पंचायत समिती बी डी ओ श्वेता पालवे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतीकडे डम्पिंग सुविधा उपलब्ध नसून वरप ग्रामपंचायत सामयिक जागेत घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलुन सुका कचरा वेगळा केला जातो. वरप ग्रामपंचायतीने पुरेशी सरकारी जागा डम्पिंगसाठी उपलब्ध होण्याबाबत उल्हासनगर तहसीलदार, जिल्हाधिकारी, वनखात्याकडे मागणी केली असल्याचे सांगितले.

दरम्यान त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावेत नाहीतर ग्रामपंचायतींना कचरा टाकण्याची जागा उपलब्ध करत नाही तोपर्यंत इमारतींना परवानग्या देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.