भिवंडीच्या पालिका कर्मचारी वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य

भिवंडी: देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना भिवंडी पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या अखत्यारीत असलेल्या पालिका कर्मचारी वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून भुयारी गटारामधून मलमूत्राचे पाणी वाहत असून ते पाणी थेट कर्मचाऱ्यांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना आपले जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागते असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र पालिकेचा आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप स्थानिक वकील भागवत वाघमारे यांनी केले आहे.

भिवंडी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी आरोग्य विभागातील बहुतांशी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या महामारीच्या कामात लावल्याने या कर्मचाऱ्यांना शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष देता येत नसल्याने ठिकठिकाणी भुयारी गटाराचे पाणी रस्त्यावरून व सोयासायटीमधून वाहताना दिसत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा उचलण्यासाठी ज्या घंटागाड्या लावल्या आहेत. त्या पूर्णवेळ काम करीत नसल्याने शहरात सर्वत्र कचरा साठल्याचे दिसून येते. प्रभाग क्रमांक ३ मधील कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाल्याचा आरोप वकील भागवत वाघमारे यांनी केला आहे. याकडे आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी लक्ष न दिल्यास परिसरात कोरोनाचा फैलाव होण्यास वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.