रोह्यात विविध फळांनी हातगाड्या सजल्या, देशी सफरचंदाला मोठी मागणी

गणपती सण अगदी थोड्या दिवसांवर आला असून रोहा तालुक्यात विविध फळांच्या हातगाड्या सज्ज झाल्या आहेत. गरिबांचे फळ म्हणून ओळखले जाणारे केळी आता ४० आणि ५० रु. डझन या किंमतीत विकली जात असून सफरचंदानी विविध हातगाड्या सजल्या आहेत.

सुतारवाडी : गणपती सण अगदी थोड्या दिवसांवर आला असून रोहा तालुक्यात विविध फळांच्या हातगाड्या सज्ज झाल्या आहेत. गरिबांचे फळ म्हणून ओळखले जाणारे केळी आता ४० आणि ५० रु. डझन या किंमतीत विकली जात असून सफरचंदानी विविध हातगाड्या सजल्या आहेत. आरोग्यासाठी अधिक गुणकारी समजल्या जाणाऱ्या सफरचंदाला फळ मार्केटमध्ये वर्षभर मागणी असते.

गेल्या आठवडाभरापासून रोहा येथील मार्केटमध्ये हिमाचल प्रदेश येथून आलेल्या सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. परदेशीसह देशी सफरचंदाची आवक सुरू झाल्याने गेल्या पाच ते सहा महिन्यापासून तेजीत असलेले सफरचंदांचे दर उतरले आहेत. त्यात कोरोना महामारीमुळे व सततची होणारी टाळेबंदी यामुळे फळ मार्केटमध्ये मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा मुख्य हंगाम असतो. तीन ते चार महिन्यांपूर्वी सफरचंदांची दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो दराने विक्री होत होती. मात्र सद्यस्थितीत हिमाचल प्रदेशातून रिचार्ज रॉयल ही जात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. तर भारतीय सफरचंदांचांही सध्या हंगाम सुरू असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात देशी सफरचंद येत आहेत. त्यामुळे परदेशी सफरचंदांच्या मागणीत घट झाली आहे.

परदेशी सफरचंदांच्या तुलनेने देशी सफरचंदाचे दरही तसे परवडण्यासारखे आहेत. सध्या किरकोळ बाजारात सफरचंद १२० ते १३० रुपये किलोच्या घरात आहेत. तर घाऊक बाजारात या सफरचंदांच्या २५ ते ३० किलोच्या पेटीसाठी किमान ३००० ते ३३०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विविध शहरातील फळबाजारात वॉशिंग्टन, अर्जेंटिना, चीन, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होत असल्याचे सांगून व्यापाऱ्यांनी शीतगृहात साठवण केलेले हे सफरचंद मागणीनुसार बाजारात आणली जातात. त्याचा वाहतूक खर्च आणि साठवणूक खर्च अधिक असल्याने त्यांचे दर किरकोळ बाजारात येईपर्यंत वाढतात. मात्र भारतीय सफरचंद दोन ते तीन दिवसात थेट बाजारात येत असल्याने त्यांचे दरही कमी असतात.

दिवाळीपर्यंत भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू राहणार असल्याने आवक वाढेल. अशी शक्यता वर्तविण्यात आली. परंतु कोरोनामुळे सफरचंदासह सर्वच फळ विक्री मंदावली असल्यामुळे तसेच सततच्या टाळेबंदीमुळे फळ विक्रेते हवलदिल झाले आहेत. आता येणा-या गणपती सणाच्या पार्श्वभूमीवरही कोरोनामुळे मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात खरेदी विक्रीला ग्राहकांचा उत्साह दिसत नसल्याचेही फळ विक्रेत्यांनी मत व्यक्त केले आहे.