नागोठणे परिसरामध्ये बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप

नागोठणे: ‘निरोप देतो देवा, आज्ञा असावी’, ‘चुकले आमचे काही, देवा माफी असावी’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा भावना व्यक्त करीत बाप्पाला आज अतिशय भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोना(corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वत्रच आणि साधेपणात गणेशोत्सव(ganpati festival) साजरा करण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून कोरोनामुळे भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाची दरवर्षीप्रमाणे उचित सेवा करता आलेली नाही कुठे ढोल ताशांचा आवाज नाही की डिजेचा दणदणाटही नाही. यावर्षी कोरोना विषाणूच्या जागतिक महामार्गाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्‍या बाप्पाचे आगमन शांततेत झाले. पाच-दहा दिवस सेवा ही अगदी शांततेत झाली याच बरोबर आज अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जनही अगदी शांततेत पण आतिशय भक्तिमय वातावरणात झाले.
यावेळी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर व परिसरांतील दहा दिवसांच्या एकूण २२० खासगी व ०६ सार्वजनिक गणपती बाप्पांना आज अतिशय शांततेत भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.नागोठणे येथील अंबा नदी घाट येथे नागोठणे शहरातील गणपती बाप्पांना भाविकांनी गर्दी न करता तसेच शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत निरोप दिला.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी व विसर्जन अगदी शांततेत व शासनाने केलेल्या नियमानुसार व्हावे यासाठी नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबा नदी घाट येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचबरोबर नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांच्यासह कर्मचारी देखील विसर्जन ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपस्थित होते.
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आगमन झालेल्या खाजगी तसेच सार्वजनिक गणरायांचे अनंत चतुर्दशीला मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. नागोठणे शहर व विभागातील विविध गावात घराघरात व सार्वजनिक मंडळ तसेच काही ग्रामस्थांनी आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षीही  गणेशाची स्थापना करुन नित्यनेमाने पूजा,आरती व अन्य धार्मिक कार्यक्रम यथायोग्य पद्धतीने पार पाडले. कोरोनामुळे सर्वच बाबतीत बंधने आली असल्याने सण-उत्सव साजरे करताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे चौकटीत साजरे करावयाचे असल्याने नागोठणे शहर व परिसरात शासकीय नियमानुसारच गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
यावर्षीच्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत यावेळी भाविकांनी अतिशय शांततेत व नियमांचे काटेकोरपणे पालन करत गणेशोत्सव साजरा केला.पण ढोल-ताशांचा गजर गुलालाची उधळण डीजेचा दणदणाट लांबच लांब मिरवणुका यावर्षी नसल्याने सारेच भक्तगण नाराज झालेले यावेळी दिसून येत होते.यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वच भाविकांनी कोरोना विषाणूचं संकट  लवकरात लवकर घालून सर्वांना सुखी ठेव असं मागणं मागितले आहे.