मुरबाडमध्ये विस्तार अधिकाऱ्याच्या खांद्यावर गटशिक्षण अधिकारी पदाचे ओझे

मुरबाड: मुरबाड(murbad) पंचायत समिती(panchayat samiti) शिक्षण विभागात गेली तीन ते चार वर्षे कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी नेमता न आल्याने सत्ताधाऱ्यांचे अपयश समोर आले आहे. सत्ताधारी गट शिक्षण अधिकारी मिळावा म्हणून स्वतःच स्वतःच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र आदळाआपट करूनही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुन्हा विस्तार अधिकाऱ्यांच्या(development officer) खांद्यावर गटशिक्षण अधिकारी पदाचे ‘ओझे’ लादत मुरबाड पंचायत समितीच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

मुरबाड तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाला गेली तीन ते चार वर्ष गटशिक्षण अधिकारी नसल्याने हा विभाग सध्या ‘बेवारस’ आहे .या विभागाचा मुख्याधिकारीच नसल्याने तालुक्यात शैक्षणिक क्षेत्राचा बोजवारा उडाला आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने या रिकाम्या खुर्चीची आठवण पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांना झाली.  त्यांनी स्वतःच्याच विरोधात स्वतःच आंदोलन करून ठाणे जिल्हा परिषदेकडे गट शिक्षण अधिकारी नियुक्तीची मागणी केली.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनीही येरे माझ्या मागल्या करत सभापतींची समजूत घालून पुन्हा या पदाचे ओझे विस्तार अधिकारी असलेल्या शीला लंबाटे यांच्या खांद्यावर लादले.
इतकी वर्षे सत्ताधाऱ्यांना त्याच बरोबर ठाणे जिल्हा परिषदेला गटशिक्षण अधिकारी या पदाच्या पात्रतेचा अधिकारी मिळू नये, याबाबत तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या बेलगाम असलेल्या शिक्षण विभागाला पालक मिळू नये यात सत्ताधाऱ्यांचे राजकारण की अपयश हा कळीचा मुद्दा आहे.