पालकमंत्री आदिती तटकरेंनी जाणून घेतल्या म्हसळा तालुक्यातील समस्या

बैठकीत म्हसळा तालुक्यातील वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, नुकसान भरपाई, शासकीय इमारती बांधकाम, नगर विकास आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. शासन स्तरावर योग्य उपाययोजना करण्याच्या बाबतीत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केल्या आणि ठरवलेले नियोजित काम वेळेत करण्याचे आदेश दिले.

म्हसळा : कोरोना प्रादुर्भाव, निसर्ग चक्रीवादळ आणि पावसाळ्यात गेले सहा महिने सर्वत्र जनजीवन विस्कळीत होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या शासन स्तरावर तातडीने सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा येथे न्यु इंग्लिश स्कूलमध्ये शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. बैठक घेण्यापूर्वी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी योजनेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. बैठकीत म्हसळा तालुक्यातील वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, नुकसान भरपाई, शासकीय इमारती बांधकाम, नगर विकास आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. शासन स्तरावर योग्य उपाययोजना करण्याच्या बाबतीत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केल्या आणि ठरवलेले नियोजित काम वेळेत करण्याचे आदेश दिले. 

या बैठकीत पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत जिल्हा परिषद सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री पाटील, सभापती उज्वला सावंत, उप सभापती मधुकर गायकर, मा.उपसभापती संदीप चाचले, नगराध्यक्षा जयश्री कापरे, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, तालुका अध्यक्ष समीर बनकर,तालुका नेते अलिशेट कौचाली, माजी सभापती नाझीम हसवारे, मा.सभापती छाया म्हात्रे, गट नेते संजय कर्णिक, माजी नगराध्यक्षा कविता बोरकर, सरपंच वनिता खोत, जिल्हा मुख्याधिकारी सचिन पाटील, प्रांताधिकारी समीर शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, गट विकास अधिकारी प्रभे, नायब तहसीलदार भिंगारे, तालुका आरोग्य अधिकारी कांबळे, वीज अभियंता वानखेडे, नगर पंचायत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, डॉ महेश मेहता,पाणी अभियंता गांगुर्डे, प्रकल्प अधिकारी तरवडे, सार्वजनिक बांधकाम अभियंता गणगणे इत्यादी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे देशात आणि प्रत्येक राज्यात सर्वच बाबतीत समस्या निर्माण झाल्या असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन दखल घेत आहे. लोकांची विस्कळीत झालेली घडी सुरळीत चालू करण्यासाठी योग्य पावले टाकली जात आहेत. विस्कळीत जनजीवन सुरळीतपणे चालू होऊन लोकांना भविष्यात भेडसावणाऱ्या समस्या आधीच सुटाव्यात यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुका आढावा बैठकीत चर्चा करून अनेक समस्यांचे निराकरण केले.