उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल एक्स-रे मशीनचे लोकार्पण

 श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सामान्य प्रणालीची एक्स- रे मशीन होती. जुन्या तंत्रज्ञानामुळे  त्या मशीनमध्ये  ठराविक एक्स -रे निघत असल्याने तसेच लोअर क्वालिटीमुळे संगणकीय युगात रुग्ण वर्गाला एक्स- रे साठी खासगी एक्स- रे क्लिनिकमध्ये जावे लागत होते. परिणामी रुग्ण वर्गाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.  रुग्णवर्गाची हेळसांड होऊ नये याकरीता पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयामध्ये डिजिटल एक्स रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते एक्स- रे सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे, वैद्यकीय अधिकारी एम जी भरणे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते .उद्घाटनानंतर आदिती तटकरेंनी रुग्णालयाची पाहणी करून सोयीसुविधांचा आढावा घेतला व संबंधितांना सूचना केल्या.