जीव घेणाऱ्या त्या बिल्डरला फाशी द्या – संतप्त रहिवाशांचा आक्रोश

महाडमधील (mahad) तारीक गार्डन (tarique garden) इमारत दुर्घटनेत मोहंमद बांगी हा ४ वर्षाचा मुलगा आणि ६८ वर्षीय मेहरूनिसा हमीद काझी या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या दोघांचे प्राण सुदैवाने आश्चर्यकारकरित्या वाचवण्यात बचावपथकाला यश आले आहे.

महाड : महाडमधील (mahad) तारीक गार्डन (tarique garden) इमारत दुर्घटनेत मोहंमद बांगी हा ४ वर्षाचा मुलगा आणि ६८ वर्षीय मेहरूनिसा हमीद काझी या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या दोघांचे प्राण सुदैवाने आश्चर्यकारकरित्या वाचवण्यात बचावपथकाला यश आले आहे.

केवळ निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच ही इमारत कोसळली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून याबाबत असंख्य तक्रारी संबंधीत बिल्डरकडे येथील रहिवाशांनी केल्या होत्या. मात्र , थातुरमातुर दुरुस्ती करून हा बिल्डर या रहिवाशांची समजूत काढत बोळवण करीत होता, अशी बाब समोर आली आहे . आज सकाळी या इमारतीमधील बचावलेली कुटुंबे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात आपल्या घरातील पैसे व चिजवस्तुंचा शोध घेत होते . मात्र यापैकी काहीही सापडत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या या कुटुंबियांना आपले अश्रू अनावर झाले होते . यावेळी या संतप्त रहिवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश करीत या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरला फासावर लटकवा अशी मागणी घटनास्थळी उपस्थित पोलीस प्रशासनाकडे केली .

या दुर्घटनेत अनेक कुटुंबात जिवीतहानी तर झालीच शिवाय आयुष्यात मेहनत करुन साठवलेल्या पुंजीतुन स्वत:चे घेतलेले घरच उध्वस्त झाले. केवळ अंगावरील कपड्यानिशी स्वत: चा जीव वाचवण्यासाठी घरातील सर्व ऐवज सोडून घराबाहेर पडलेल्या अनेक कुटुंबांनी संपुर्ण आयुष्यभराची पुंजीच गमावल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून आले. आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्याची आता काळजी वाटतेय, आमच्या मुलाबाळांची शिक्षणं कशी करायची ? असे अनेक सवाल यावेळी या दुर्घटनाग्रस्तांनी प्रशासनासमोर केले .

या इमारतीत राहणाऱ्या इरफान जोगीलकर यांना तर आपले दु:ख मांडताना अक्षरश: रडू कोसळले . इरफान यांची मिनीडोअर रिक्षा आहे. तेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन. मात्र या इमारतीखाली संपुर्ण मिनीडोअर चिरडून तिचा चेंदामेंदा झाला आहे . त्यामुळे आता हा व्यवसायदेखील करणे अशक्य असल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? असा जटील प्रश्न जोगीलकर यांना पडला आहे . त्यांचा एक मुलगा इंजिनीअरींगच्या तिसऱ्या वर्षात आहे . त्याच्या काॅलेजच्या फीसाठी पै पै करून जमा केलेले सत्तर हजार रुपये घरातच जपून ठेवले होते. मात्र इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच घरातील चिजवस्तू आणि कपाटातील हे पैसे घरातच सोडून जोगीलकर कुटुंबाने बचावासाठी पळ काढावा लागला. जोगीलकर यांच्याप्रमाणे या दुर्घटनेतील मुस्तुफा समद चाफेकर , इर्शाद अनवारे, नदीम बांगी , हसीम शेखनाग , अन्सारी ,शौकत अलसुरकर, अयुब चिचकर , अख्तर पठाण , दाऊद हजवाने आदी कुटुंबेदेखील याच संकटात सापडलेली आहेत. एका कुटुंबाला तर स्वत:च्या घराबरोबरच शंभरहून अधिक तोळे सोन्यासह लाखो रुपयांचा ऐवज यात गमावल्याचे सांगताना भावना अनावर झाल्या होत्या.