आरोग्यमंत्र्यांनी सांगितली कोरोनासोबत जगताना वापरायची त्रिसूत्री

कोरोनाच्या उपचाराच्या बाबतीत राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी काही निर्णय घेतले आहेत. कोरोनासोबत जगत असताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्वाची आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ते कोरोनाशी दोन हात या दूरदर्शनवरील कार्यक्रमात बोलत होते.

सध्या आपल्याकडे कोरोनावर लस नाही. लस यायला किती महिने लागतील माहित नाही.  लॉकडाऊन करत राहिलो तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. उद्योगपती रतन टाटा यांनी सांगितले आहे की, नफा आणि नुकसान याचा विचार करायचा नाही. हे वर्ष फक्त जगण्यासाठी आहे. आपण जगायला हवं. हे करताना एसएमएस ( एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायझर) या त्रिसुत्रीवर जगणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, सगळ्या गोष्टींवर मनाचा ब्रेक लावणे गरजेचे आहे. अनावश्यक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. गर्दीत जाणे टाळले पाहिजे. सतर्कता म्हणून आपण अनेक गोष्टी सुरु केलेल्या नाहीत. मात्र एसएमएस पद्धतीचा वापर करून आपले कार्य करावे. अनावश्यक गोष्टी टाळाव्यात.

शाळेच्या बाबतीत ते म्हणाले,शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन स्कुलिंग सुरु आहे. काही ठिकाणी यात अडचणी आहेत. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन स्कुलिंग कायम ठेवता येणार नाही. लस येईपर्यंत ते तसंच सुरु ठेवावे लागेल. मुलांचे नुकसान व्हायला नको.

याशिवाय आरोग्यमंत्र्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेबाबत माहिती दिली. एकूण १००० रुग्णालये आहेत जिथे १०० कॅशलेस सुविधा सुरु आहे. सामान्य माणसांचे हित कसे जपता येईल या दृष्टीकोनातून सगळी धोरणे आखली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.