वादळी पावसाचा श्रीवर्धन तालुक्याला जोरदार तडाखा

मुसळधार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील अनेक ठिकाणचे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नदीचे पाणी सखल भागांमध्येदेखील घुसल्याचे पाहायला मिळाले.

श्रीवर्धन: काल संध्याकाळपासून श्रीवर्धन तालुक्‍याला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. काल ऑगस्ट महिन्याची तीन तारीख असल्यामुळे चक्रीवादळाला दोन महिने पूर्ण झाले. परंतु सायंकाळच्या सुमारास जोरदार वारे व पावसाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा चक्रीवादळाच्या आठवणी नागरिकांमध्ये जाग्या झाल्या.

श्रीवर्धन शहर सखल भागात वसलेले असले तरीही या ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार अत्यल्प प्रमाणात घडतात. श्रीवर्धन शहराची पाणी निचरा होण्याची क्षमता चांगली असल्यामुळे समुद्राला ओहोटी आल्यानंतर श्रीवर्धन शहरातील पाणी पूर्णपणे खाली जाते. हवामान खात्याने चार, पाच, सहा ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणचे नदी-नाले दुथडी भरून  वाहू लागले आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नदीचे पाणी सखल भागांमध्ये देखील घुसल्याचे पाहायला मिळाले. दांडगुरी परिसरातून दिवेआगरकडे जाणाऱ्या नदीचे पाणी खुजारे परिसरात रस्त्यावरती येते. कालच्या पावसामुळे आज सकाळी सुद्धा त्या ठिकाणी पाणी भरलेले होते. तसेच वाळवटी ते आरावी या मार्गावरती देखील नदीचे पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

चक्रीवादळामुळे अनेक आरसीसी घरांवरील छताचे पत्रे सैल झालेले आहेत, त्यामुळे जोरदार वारे सुटल्यानंतर हे पत्रे धडधड वाजू लागतात. त्यामुळे घरांमधील वृद्ध व्यक्ती व लहान मुलांमध्ये घबराट निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते. श्रीवर्धन समुद्र किनार्‍यावर असलेली केतकीची बने व  सुरूची झाडे चक्रीवादळामध्ये पूर्णपणे मोडून गेल्याने आता वारा थेट गावामध्ये घुसतो. त्यामुळे वाऱ्याचा वेग जास्त असल्याचे जाणवते. तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.