तळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

दिवसरात्र कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील संगम नदीला पूर येऊन बेलघर,चरई,तळेगाव, पन्हेळी,गणेश नगर, कासेखोल तसेच पिटसई व पिटसई कोंड आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

तळा: मंगळवारी दिवसरात्र तुफान बरसल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही तळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पावसासह वादळी वारा सुटल्याने नागरिकांच्या उरात धडकी भरली. दिवसरात्र कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील संगम नदीला पूर येऊन बेलघर,चरई,तळेगाव, पन्हेळी,गणेश नगर, कासेखोल तसेच पिटसई व पिटसई कोंड आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

तालुक्यातील शहराचा विचार करता उंचीवर असल्या कारणाने कितीही पाऊस पडला तरी शहरात पाणी साचत नाही मात्र ग्रामीण भागात नदीला लागून गाव असलेल्या नागरिकांचे या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यात दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामध्ये पावसासोबत जोरदार सोसाट्याचा वारा सुटल्याने पुन्हा निसर्ग चक्रीवादळाची परिस्थिती उद्भवते की काय अशी भीती नागरिकांना वाटू लागली. प्रशासनाकडून नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व पुराच्या पाण्यातुन वाहने चालवू नयेत, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.