महाडमधील दुर्घटनाग्रस्तांना सढळ हाताने मदत करा – जिल्हाधिकारी

महाड : महाडमधील(mahad) तारीक गार्डन(tarique garden) इमारत दुर्घटनेनंतर शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची माहिती जाणून घेण्यासाठी आवाज ग्रुपचे अध्यक्ष दिलदार पुरकर व सदस्य संजय भुवड यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी(collector nidhi choudhary) यांची भेट घेतली. तसेच या दुर्घटनेनंतर तातडीने महाड येथे दाखल होऊन मदतकार्याची सुत्रे झपाट्याने हलवल्याबद्दल त्याच प्रमाणे या दुर्घटनेतील रहिवाशांसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे जाहीर आवाहन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या वारसांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या ५ लाखाच्या निधीपैकी मुख्यमंत्री रिलिफ फंडातून(chief minister relief fund) प्रत्येकी १ लाखाची मदत आली असून पुर्नवसन विभागाची प्रत्येकी ४ लाखाची मदत सायंकाळपर्यंत जमा होईल असे सांगितले. या दुर्घटनाग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत करा, असे आवाहन आपण जनतेला केले आहे. सामाजिक पातळीवर स्थानिक संघटना एनजीओ यांच्याकडून जास्तीत जास्त मदत या दुर्घटनाग्रस्तांना मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील राहा असा सल्ला त्यांनी दिला.
दुर्घटनाग्रस्त तारीक गार्डनमधील फ्लॅटधारकांनी एकत्रित राहून एक सोसायटी तयार करावी आणि या सोसायटीचे स्वतंत्र बँक खाते काढून येणारे मदतीचे पैसे या खात्यात जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. शासनाने या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल केला आहे असेही त्यांनी सांगितले.