मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन मदत केली जाहीर

महाड: रायगड जिल्ह्यातील महाड येथील खरकांड मोहल्ला हापूस तलावाजवळ असलेल्या तारिक गार्डन नावाची इमारत काल  सायंकाळी ६ च्या सुमारास कोसळली. ही माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळताच बचाव कार्यसाठी त्यांनी पुणे येथून एनडीआरच्या तीन तुकड्या तातडीने महाड येथे पाठविल्या. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घटनास्थळाची संपूर्ण माहिती घेतली. वडेट्टीवार यांनी आज महाड येथे तातडीने जाऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आमदार भारत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप व नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्यासोबत चर्चा केली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्याच्या वारसदारांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या त्यांचा विभागाकडून प्रत्येकी ४ लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे ५ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची मदत विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली. या दुर्घटनेत किमान २२ जणांच्या कुटुंबाची घरे उध्वस्त झालेली असल्याने त्यांना भरीव मदत मिळण्यासाठी उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करणार असून त्यांना तातडीने भरीव मदत देण्याचे काम महाविकास आघाडी करणार आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

दरम्यान आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २६ तासानंतर बिल्डिंग दुर्घटनेतील एका महिलेला वाचविण्यात यश आले आहे. मेहरुन्निसा अब्दुल हमीद काझी असे या महिलेचे नाव आहे.