महाडमधील दुर्घटनाग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु, सोनू सुदचाही पुढाकार

महाड : महाड(mahad) शहरातील काजळपुरा भागात तारीक गार्डन(tarique garden) इमारतीच्या दुर्घटनेनंतर या इमारतीतील बेघर झालेल्या रहिवाशाच्या मदतीकरिता समाजातील सेवाभावी संस्थांसह सेलिब्रेटीही सरसावले आहेत.

दुर्घटनाग्रस्त तारीक गार्डन इमारतीमध्ये ४७ सदनिकांमधून सुमारे २०० नागरिक वास्तव्य करीत होते. यापैकी १० ते १२ कुटुंबीय ही भाडेतत्त्वावर राहात होती. सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर या सर्वांचे संसार उद्ध्वस्त झाले असून बेघर झालेल्या नागरिकांकरिता समाजातील विविध सेवाभावी संस्थांकडून(help) मदतीची घोषणा करण्यात येत आहे. यामध्ये अंजुमन अॅन्ड-उल-मुस्लिम दाभोळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकिन समिती जेद्दाह, कादीरी चॅरिटी यूकेशी संपर्क साधला आणि त्यांच्या सहकार्याने दि २६ ऑगस्ट बुधवारी १२ कुटुंबाना प्रतेकी १० हजार रुपये रोख रक्कम देण्यात आले असल्याची माहिती या संस्थेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या मदतीमुळे इमारतीतील बेघर झालेल्या नागरिकांना त्यांच्या लहान मुलाबाळांसाठी आवश्यक असणाऱ्या गरजा त्वरित पूर्ण करता येतील असा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात आला.
याच बरोबर या दुर्घटनेच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता इमारती मध्ये अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढताना गंभीररित्या जखमी झालेल्या नावीद दुस्ते यांच्यावर नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत दुस्ते यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्यांचा एक पाय ढोपरापासून खाली कट करावा लागला आहे. गरीब कुटुंबातील असलेल्या आणि इलेक्ट्रीकची कामे करून आपले कुटुंब चालविणाऱ्या दुस्ते कुटुंबियांना या उपचारासाठी लागणारा लाखोचा खर्च करणे परवडणारा नाही. मात्र माध्यमांमुळे ही बातमी प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका फराह खान(farah khan) यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्याकडून सोनू सूद(sonu sood) यांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात हजारो परप्रांतियांसाठी देवदूत ठरलेला सोनू सूद तारीक गार्डन दुर्घटनेत फरिश्ता ठरलेल्या नवीद दुस्तेसाठीही धावून आला. सोनू सूद यांनी नावीदचे मेव्हणे परवेझ कौचाली यांना स्वतः फोनवरून संपर्क साधत नावीदच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्चाची जबाबदारी स्विकारल्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी नाशिक येथे झालेल्या अशाच प्रकारच्या दुर्घटनेत आपला पाय गमावून बसलेल्या गरजवंताला आपण मदत करून त्याला त्याच्या पायावर उभे केले. त्यापेक्षा चांगल्या प्रती चा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी वापरलेला पाय आपण नावीदला बसवू असे आश्वासन सूद यांनी दिले आहे
शासनाकडूनदेखील या बेघर झालेल्या नागरिकांकरिता तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी जाहीर केलेली पाच लाखाची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाडचे तहसिलदार यांचे कडे पाठवण्यात आली असून वारसदारांनी आपल्या बँक खात्याचे डिटेल तहसिलदारांना दिल्यानंतर हे पैसे त्यांचा खाती जमा होणार आहेत सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील संस्थांनी सुरू केलेल्या या मदतीमध्ये सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्टचे अध्यक्ष मुफ्ती रफीक पुरकर व दाभोळ मदरसाचे मुफ्ती असगर खोपटकर यांच्याकडून करण्यात आले आहे .