राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात भरघोस वाढ 

भिवंडी: उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचे दर १० ऑगस्ट २०२० च्या अधिसूचनेद्वारे सुधारित केले आहेत. हे लागू करण्यात आलेले सुधारित किमान वेतन कुशल, अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार व परिमंडळ निहाय मंजूर करण्यात आले आहेत.

परिमंडळ १ मधील कुशल कर्मचाऱ्यास रुपये १४१२५ ,अर्धकुशल रुपये १३४२० व अकुशल रुपये १३०८५ , परिमंडळ २ कुशल कर्मचाऱ्यास रुपये १३७६०,अर्धकुशल रुपये १३०५५ ,अकुशल रुपये १२७१५,परिमंडळ ३ मधील कुशल कर्मचाऱ्यास रुपये १२६६५ , अर्धकुशल रुपये ११९६० ,अकुशल रुपये ११६२५ या वाढीव दराने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन मंजूर करण्यात आले आहे.अशी माहिती विभाग अध्यक्ष विकास भोईर यांनी दिली आहे.

याअगोदर २८ मे २०१९ रोजी उद्योग ,ऊर्जा व कामगार विभागाने ११२६६ ते ८०९२ हे अतिशय कमी किमान वेतनाचे दर लागू केले होते.मात्र हे किमान वेतनाचे दर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला मान्य नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जून २०१९ मध्ये शासनाकडे हरकत घेऊन वेतन वाढवण्याची मागणी लावून धरली होती. ही बाब महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या २७ डिसेंबर २०१९ रोजीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आली होती. या किमान वेतन सल्लागार मंडळाच्या बैठकीत कुशल कर्मचारी २००० रुपये, अर्धकुशल १५०० रुपये, अकुशल कर्मचाऱ्यास १००० रुपये इतके किमान वेतन वाढविण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार वेतनवाढीचा प्रस्ताव कामगार आयुक्तांनी प्रधान सचिव उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाकडे ५ मार्च २०२० रोजी मंजुरीसाठी पाठविला होता. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुधारित किमान वेतन लागू होण्यास विलंब होत होता. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष  विलास कुमरवार व राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर, कार्याध्यक्ष आर. एस. काझी ,विभाग अध्यक्ष विकास भोईर आदींनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील  व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू तसेच किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष  रघुनाथ कुचिक यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत दराने किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले  आहे. या कामासाठी भिवंडी तालुका अध्यक्ष दुर्वेन  पाटील ,सचिव देवेंद्र काठे ,राज्य सदस्य तथा कल्याण तालुका अध्यक्ष अजय जाधव, जिल्हाध्यक्ष दत्ता भोईर, सचिव शशिकांत ठाकरे , किशोर पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष सुरेश गायकर ,सुनिल घरत आदींनी  वेळोवेळी सहकार्य केले आहे.