भिवंडीत हिंदुत्ववादी संघटनांनी साजरा केला आनंदोत्सव

भिवंडी : पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयोध्यात श्रीराम जन्मभूमीचा वाद संपुष्टात येऊन मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला व कोट्यवधी नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री राम मंदिर उभारणीचा सोहळा अयोध्या या ठिकाणी संपन्न होत असताना त्याचा आनंदोत्सव संपूर्ण देशभरात हिंदुत्ववादी संघटनांसह भारतीय जनता पार्टीकडून साजरा केला जात आहे .

भिवंडी शहरात ठिकठिकाणी हा आनंदोत्सव साजरा होत असताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांना थांबवून त्यांना पेढे भरविले. रामाचा जयजयकार करण्यात आला तर शहरातील शिवाजी चौक या मध्यवर्ती ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अयोध्या राम मंदिर उभारणीच्या प्रत्यक्ष कारसेवेत सहभाग घेतलेले त्रैलोक जैन यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारून जयजयकार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार महेश चौघुले ,भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी ,राजेश कुंटे आदींसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यासोबत शहरातील विविध भागात फटाके फोडून पेढे वाटून श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला आहे .