तांबडी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

रोहा: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर तांबडी येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. आरोपींवर दोषारोपपत्र तातडीने दाखल करा, सर्व प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे, सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी चोहोबाजूने मुख्यतः विविध मराठा संघटनांकडुन होत आहे. मराठा क्रांती मोर्चाला प्रारंभ तांबडीतून करू, स्थानिक मराठा संघटना मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत अशा सर्वच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दुपारी तांबडी येथे भेट दिली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन तांबडी अत्याचार व खून प्रकरणावर भाष्य केले.

दरम्यान लहानग्या भगिनीवर अत्याचार केले, त्यानंतर निर्दयीपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. कोपर्डीनंतर हे दुसरे भयानक प्रकरण आहे म्हणत राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या. दुसरीकडे स्थानिक मराठा संघटना विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे समोर आल्याने खुद्द गृहमंत्री आल्याचे फलीत काय, स्थानिक पातळीवर मोर्चा काढणार का ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तांबडी येथे २६ जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार व खुन केल्याची घटना घडली आणि सबंध महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. कोपर्डीत मराठा समाजातील मुलीची निर्दयपणे हत्या करण्यात आली. त्यापाठोपाठ तांबडी येथील अल्पवयीन मुलीवरही अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केली. त्यामुळे स्थानिक यांसह राज्य स्तरावरून मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला. सर्व समाजातून घटनेचा निषेध करून आरोपींवर तातडीने दोषारोप पत्र दाखल करावे, खटला फास्ट ट्रॅक करावा, ॲड. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी मागणी झाली. त्यादृष्टीने विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, महिला मोर्चाच्या चित्रा वाघ, आ.विनायक मेटे, माजी आ.माणिकराव जगताप, विनोद घोसाळकर यांसह मराठा क्रांती मोर्च्याच्या नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन सरकारचे लक्ष वेधले. स्थानिक मराठा समाज न्याय मागणीवर ठाम राहिला. अखेर सर्व स्थिती विचारात घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जवळपास महिन्याभराने पीडित कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली. पीडित कुटुंब व समाजाची भावना लक्षात घेत गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे भाष्य केले.पीडित कुटुंबाच्या भेटी दरम्यान पालकमंत्री अदिती तटकरे, खा.सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे उपस्थित होते.

आयोजित पत्रकार परिषदेत तांबडी येथिल घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. खटला फास्ट ट्रॅकवर चालविले जाईल. अॅड.उज्वल निकम हेच सरकारी वकील म्हणून काम पाहतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आरोपींवर लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रयत्न आहे. पीडित कुटुंब व समाजाची भावना लक्षात घेऊन पीडितेला न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहील असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.  तालुका,स्थानिक मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले. त्यामुळे पुढे नेमके काय होणार , स्थानिक मराठा समाज संघटना काय पवित्रा घेतात ? हे पाहावे लागणार आहे.